Join us  

'या' चार क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा; 1 लाख कोटींहून अधिक नफा मिळवणारी पहिली कंपनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 8:37 PM

Reliance Industries Ltd: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे.

Reliance Industries Ltd:  भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चा व्यवसाय सातत्याने वाढत आहे. 1 लाख कोटी रुपयांचा वार्षिक करपूर्व नफा नोंदवणारी RIL ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीचा निव्वळ नफा एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 7 टक्क्यांनी वाढून 79,020 कोटी रुपये झाला आहे. याशिवाय, कंपनीने कंझ्यूमर बिझनेस आणि एनर्जी क्षेत्रातील वाढीमुळे 10 लाख कोटी रुपयांहून अधिकचा वार्षिक महसूल नोंदवला आहे. तसेच, 31 मार्च रोजी पूर्ण झालेल्या आर्थिक वर्षासाठी EBITDA 16.1 टक्क्यांनी वाढून 1.79 लाख कोटी रुपये झाला आहे. यामुळे कंपनीने प्रति शेअर 10 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

तिमाही निकाल31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा 21,243 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. प्रेस नोटनुसार, चौथ्या तिमाहीत कंपनीच्या मालकांचा नफा 18,951 कोटी रुपये झाला. देशातील सर्वात मूल्यवान कंपनीने 31 मार्च रोजी पूर्ण झालेल्या तिमाहीत 2.41 लाख कोटी रुपयांचा महसूल नोंदविला. ब्रोकरेज तज्ञांनी 2.39 लाख कोटी रुपयांच्या महसुलासह 18,248 कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज लावला होता.

ऑईल आणि गॅस व्यवसाय वाढलारिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, करपूर्व नफ्यात रु. 1,00,000 कोटींचा टप्पा ओलांडणारी RIL ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. जगभरात इंधनाची वाढती मागणी आणि रिफायनरी व्यवस्थेतील समस्यांमुळे कंपनीचा ऑईल आणि गॅस व्यवसायात (O2C) चांगला नफा झाला आहे. मात्र, वर्षभरात रासायनिक उद्योगात अडचणी आल्या. या आव्हानांना न जुमानता खर्चाचे व्यवस्थापन आणि कामकाजावर लक्ष केंद्रित केल्यामुळे कंपनीची कामगिरी मजबूत राहिली. कंपनीच्या KG-D6 ब्लॉकमधून दररोज 30 कोटी स्टँडर्ड क्यूबिक मीटर (MMSCMD) गॅसची निर्मिती केली जात आहे. हे देशाच्या एकूण घरगुती गॅस उत्पादनाच्या 30 टक्के आहे.

जिओच्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढलीमुकेश अंबानी यांनी असेही सांगितले की, कंपनीच्या डिजिटल सर्व्हिस सेगमेंटमध्ये (Jio) मोबाईल आणि फिक्स्ड वायरलेस सेवा, दोन्ही पुरवल्यामुळे ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कंपनी नवीन प्रकल्प आणि उपक्रम पूर्ण करण्यासाठी तयार आहे, विशेषत: नवीन ऊर्जा क्षेत्रात, ज्यामुळे कंपनी आणखी मजबूत होईल आणि भविष्यात सातत्याने वाढेल. कंपनीचे चार प्रमुख व्यवसाय - ऑईल आणि गॅस, रिटेल, जिओ आणि O2C ने चांगली कामगिरी केली आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सव्यवसायगुंतवणूक