Join us  

रिलायन्स कॅपिटल सर्व कर्ज व्यवसायातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 4:05 AM

रिलायन्स कॅपिटल कंपनी सर्व प्रकारच्या ‘कर्ज व्यवसाया’तून (लेंडिग बिझनेस) बाहेर पडणार आहे.

मुंबई : अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे (एडीएजी) चेअरमन अनिल अंबानी यांनी सोमवारी सांगितले की, समूहातील रिलायन्स कॅपिटल कंपनी सर्व प्रकारच्या ‘कर्ज व्यवसाया’तून (लेंडिग बिझनेस) बाहेर पडणार आहे. त्याऐवजी कंपनी आता रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स या कंपन्यांत वित्तीय भागधारक बनेल.वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी म्हणाले की, व्यवसाय रूपांतराचा भाग म्हणून रिलायन्स कॅपिटलने कर्ज व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नव्या व्यवस्थापन व भागधारणा रचनेत कंपनी केवळ वित्तीय भागधारक म्हणून भूमिका बजावेल. यात रिलायन्स कॅपिटलचे प्रभावी कर्ज २५ हजार कोटींनी कमी होईल. मागील सहा महिन्यांत कंपनीला अनेक कारणांमुळे फटका बसला. वित्तीय सेवा क्षेत्रात संकट, लेखा परीक्षक व मानक संस्थांची अव्यवहार्य कृती व अर्थिक मंदी यांचा या कारणांत समावेश आहे. कंपनीचे ६० हजार कोटी रुपये नियामकीय व लवाद प्रक्रियेत अडकले आहेत. ही प्रकरणे तब्बल ५ ते १० वर्षांपासून प्रलंबित आहेत.

 

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स