Join us

महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 09:40 IST

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील फरारी मालकाला १ कोटी ४२ लाख रुपयांचा रोड टॅक्स भरावा लागला आहे. नक्की प्रकरण काय? जाणून घ्या

जर तुमचं वाहन एखाद्या राज्यात रजिस्टर नसेल आणि तुम्ही त्या राज्यात बराच काळ वाहन चालवत असाल तर तुम्हाला तसं करणं महागात पडू शकतं. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील फरारी मालकाला १ कोटी ४२ लाख रुपयांचा रोड टॅक्स भरावा लागला आहे. ही सुपर लक्झरी गाडी महाराष्ट्रात रजिस्टर असली तरी बंगळुरूच्या रस्त्यांवर बऱ्याच काळापासून धावत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटक आरटीओचे अधिकारी त्यावर लक्ष ठेवून होते. अखेर ती पकडली गेली आणि मालकाला भरमसाठ कर आणि दंड भरावा लागला.

एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील आरटीओ अधिकाऱ्यांनी फरारी मालकाकडून १.४२ कोटी रुपयांचा रोड टॅक्स वसूल केला आहे. अलीकडच्या काळात एकाच वाहनाकडून वसूल करण्यात आलेला हा सर्वात मोठा रोड टॅक्स आहे. ही कार फेरारी एसएफ ९० स्ट्रॅडेल होती आणि त्याची किंमत ७.५ कोटी रुपयांपासून सुरू होते. बंगळुरूच्या रस्त्यांवर अनेक दिवसांपासून लाल रंगाची गाडी धावत होती. अखेर गुरुवारी सकाळी बेंगळुरू दक्षिण आरटीओनं त्याचा शोध घेऊन त्याच्या टॅक्सच्या स्थितीची पडताळणी केली.

Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित

काय आहे नियम?

या गाडीचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात करण्यात आलं होतं. आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहन जप्त करून मालकाला नोटीस पाठवून सायंकाळपर्यंत पैसे भरण्यास सांगितले. कर न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही नोटीसमध्ये म्हटलं होतं. वाहनमालकानं तात्काळ थकबाकी व १ कोटी ४१ लाख ५९ हजार ४१ रुपयांचा दंड भरला. कर न भरता धावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचं परिवहन विभागाचं म्हणणं आहे. फेब्रुवारी महिन्यातही विभागानं ३० लक्झरी वाहनं जप्त केली होती.

नियमांनुसार, जर तुम्ही तुमचं वाहन तात्पुरतं दुसऱ्या राज्यात नेत असाल तर तुम्हाला त्या राज्यात त्याची रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. पण जर तुम्ही तुमची कार जास्त काळ दुसऱ्या राज्यात ठेवली तर तुम्हाला त्या राज्यात रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करावं लागेल. तसं न केल्यास दंड आणि इतर कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

टॅग्स :फेरारीबेंगळूरमुंबई