Join us

खाद्यतेलावरील आयात कर निर्णय पुढे ढकला; उद्योग क्षेत्राची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:55 IST

जागतिक बाजारांत किमतींत घसरण

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील खाद्यतेलांच्या घसरत्या किमतींचा तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांत प्रतिकूल संदेश जाऊ  नये, यासाठी खाद्यतेलावरील आयात कर कमी करण्याचा निर्णय तूर्त पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी तेल उद्योग क्षेत्राकडून करण्यात आली आहे. जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती मागील १० दिवसांत ६ ते ८ टक्क्यांनी उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही मागणी आली आहे.सोयाबीन एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील घसरत्या किमती लक्षात घेता या हंगामातील तेलबियांची लागवड पूर्ण झाल्यानंतरच तेल आयात करातील कपात करणे हिताचे राहील. आयात कर कमी केल्यानंतर तेलाच्या किमती झपाट्याने घसरतील. सध्या तेल आयातीवर १५ टक्के शुल्क लागते. सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात मागील दहा दिवसांत कच्च्या पामतेलाचे दर प्रतिटन १,२५० डॉलरवरून घसरून १,१५० डॉलरवर आले आहे. सोयाबीन तेल १,४८० डॉलवरून १,३८० डॉलरवर, तर सूर्यफूल तेल १०० डॉलरनी घसरून १,५५० डॉलरवर आले आहे.