Join us  

RBIने द्रविडसारखं टिच्चून राहावं, सिद्धू सारखं नको!; ऊर्जित पटेलांना 'रघुराम मंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 5:22 PM

या वादात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उडी घेतली आहे.

नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) आणि केंद्र सरकारमधील वाद सर्वश्रुत आहे. त्यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद असून, या वादात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उडी घेतली आहे. आरबीआयची भूमिका राहुल द्रविडसारखी धीर-गंभीर निर्णय घेणारी असली पाहिजे. नवज्योत सिंह सिद्धूसारखी भाषणबाजी करणारी नव्हे, असं राजन म्हणाले आहेत. राजन यांनी केंद्र सरकार आरबीआयच्या कारभारात करत असलेल्या हस्तक्षेपावरही टीका केली आहे.राजन म्हणाले, सद्यस्थितीत केंद्रीय बँकेची भूमिका ही कारच्या सीट बेल्टसारखी आहे. जी दुर्घटना रोखण्यासाठी गरजेची आहे. यावेळी राजन यांनी केंद्रीय बँक व केंद्रातील मतभेद, सेक्शन सातचा वापर, गैर बँकिंग वित्तीय कंपनी(एनबीएफसी)चं संकट, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए), केंद्रीय सूचना आयोग(सीआयसी) आणि आरबीआयच्या बोर्डसहीत अनेक मुद्द्यांवर मोकळेपणानं विचार मांडले आहेत. रुपयाचा योग्य स्तर कोणता यासंदर्भात काहीही सांगू शकत नाही. केंद्र सरकारनं सेक्शन सातचा वापर केला नाही ही चांगलीच गोष्ट आहे. जर सेक्शन 7 या कायद्याचा वापर केला असता, तर दोघांमधील संबंध आणखी बिघडले असते. आरबीआय आणि केंद्रामध्ये संवाद अद्यापही सुरू आहे आणि ते दोघेही एकमेकांचा सन्मान ठेवून काम करत आहेत.आरबीआय ही सरकारची एक एजन्सीच्या स्वरूपात काम करते. आरबीआयवर काही विशेष जबाबदा-याही सोपवण्यात आल्या आहेत. केंद्रानंही आरबीआयच्या स्वायत्ततेचा सन्मान करावा. केंद्रीय बँक ही ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या केंद्र सरकारच्या सीट बेल्ट सारखी आहे. त्यामुळे सीट बेल्ट वापरायचा की नाही हा केंद्रानं विचार करावा. सीट बेल्ट घातल्यानं दुर्दैवी घटनांपासून बचावासाठी मदत मिळते. सरकार विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करतेय. तर आरबीआय वित्तीय स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते.अर्थ व्यवस्थेत स्थिरता टिकवून ठेवण्याची आरबीआयवर जबाबदारी आहे. केंद्र आणि आरबीआय एकमेकांबरोबर काम करू शकतात. परंतु दोघांनी एकमेकांच्या अधिकार क्षेत्राचा सन्मान केला पाहिजे. फसवणूक करणा-यांना योग्य शिक्षा मिळाली नाही, तर त्यांचं इतरही लोक अनुकरण करतील आणि असे प्रकार वाढीस लागतील, असंही रघुराम राजन म्हणाले आहेत. 

टॅग्स :रघुराम राजनभारतीय रिझर्व्ह बँकउर्जित पटेल