Join us  

आरबीआयचा तिहेरी धक्का; मोदी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 1:08 PM

विकास दराच्या अंदाजात घट; रेपो रेट जैसे थे

मुंबई: रेपो रेट जैसे थे ठेवत सर्वसामान्यांना धक्का देणाऱ्या रिझर्व्ह बँकेनं मोदी सरकारलादेखील धक्के दिले आहेत. चालू आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवणाऱ्या आरबीआयनं आता त्यात १.१ टक्क्याची कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज आरबीआयनं व्यक्त केला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचं संकट आणखी गहिरं होण्याची शक्यता आहे.  एका बाजूला विकास दर कमी राहील असा अंदाज व्यक्त करणाऱ्या आरबीआयनं दुसऱ्या बाजूला महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या ३.५ टक्के असलेला महागाई दर ३.७ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आरबीआयकडून वर्तवण्यात आला आहे. आर्थिक आघाडीवर संकटात सापडलेल्या मोदी सरकारला आरबीआय रेपो रेट कमी करुन काहीसा दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र अनेकांची अपेक्षा फोल ठरली. सलग पाचवेळा रेपो रेट कमी करणाऱ्या आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवले. त्यामुळे आता रेपो रेट ५.१५ टक्के इतकाच असेल. याआधी रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. त्याआधीही चार वेळा आरबीआयनं रेपो रेट कमी करत मोदी सरकारला दिलासा दिला होता. काही दिवसांपूर्वी विकास दराचे आकडे जाहीर झाले. देशाच्या जीडीपीमध्ये मागील तिमाहीत केवळ ४.५ टक्क्यांची वाढ झाल्याचं त्यातून समोर आलं. जीडीपी वाढीचा हा गेल्या ६ वर्षांतील निच्चांक आहे. त्यामुळेच आरबीआय रेपो रेट कमी करेल अशी आशा अर्थ वर्तुळातील अनेकांसह सरकारलादेखील होती. मात्र या सगळ्यांनाच आरबीआयनं जोरदार धक्का दिला. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकनरेंद्र मोदी