Join us

तुमच्या हातातील नोटही महाग; नोटा छपाई खर्चात २५% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:40 IST

आरबीआय सोने आणि परकीय चलन व्यवहारांमुळे झाली आणखी श्रीमंत

मुंबई : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेचा नोटा छपाईचा खर्च वार्षिक आधारावर सुमारे २५ टक्क्यांनी वाढून ६,३७२.८ कोटी रुपये झाल्याचे समोर आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात नोटा छपाईचा खर्च ५,१०१.४ कोटी रुपये होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, चलनात असलेल्या बँक नोटांचे मूल्य आणि प्रमाण अनुक्रमे सहा टक्के आणि ५.६ टक्क्यांनी वाढले आहे.

२०२४-२५ मध्ये ५०० रुपयांच्या बँक नोटांचा वाटा ८६ टक्के होता, तो किरकोळ घटला. चलनातील एकूण बँक नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा वाटा सर्वाधिक ४०.९ टक्के होता. त्यानंतर, १० रुपयांच्या नोटांचा वाटा १६.४ टक्के होता. चलनात असलेल्या एकूण बँक नोटांमध्ये कमी मूल्याच्या बैंक नोटांचा वाटा (१० रुपये, २० रुपये आणि ५० रुपये) ३१.७ टक्के आहे.

नोटांच्या छपाईसाठी कच्चा माल देशातूनच खरेदी

२०२४-२५ दरम्यान बँकिंग क्षेत्रात जप्त केलेल्या एकूण बनावट भारतीय चलनी नोटांपैकी ४.७ टक्के पकडण्यात आल्या. १०, २०, ५०, १०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये घट झाली.

२०० आणि ५०० रुपयांच्या 3 बनावट नोटांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे १३.९ आणि ३७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोटांसाठी नवीन, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये सादर करण्याची प्रक्रिया सतत सुरू आहे.

नोटांच्या छपाईसाठी वापरला जाणारा सर्व प्राथमिक कच्चा माल, जसे की बँक नोट कागद, सर्व प्रकारची शाई आणि इतर सर्व सुरक्षासंबंधित वस्तू आता देशांतर्गत खरेदी केल्या जात आहेत.

ई-रुपीच्या मूल्यात ३३४ टक्क्यांनी वाढ

चलनातील नाण्यांचे मूल्य आणि प्रमाण अनुक्रमे ९.६ टक्के आणि ३.६ टक्क्यांन वाढले. चलनात असलेल्या ई-रुपीच्या मूल्यात ३३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे सध्या २, ५, १०, २०, ५०, १००, २००, ५०० रुपयांच्या नोटा चलनात आहेत. रिझर्व्ह बँक आता २, ५ आणि २००० रुपयांच्या नोटा छापत नाही.

गुंतवणूक कुठे? 

सोने ५२.०९% देशांतर्गत गुंतवणूक १४.३२% परदेशी गुंतवणूक १.७०%

४.३२ लाख कोटींचे सोने

आरबीआयकडे आरबीआयकडे मालमत्ता म्हणून ठेवलेल्या सोन्याचे मूल्य ५७.१२ टक्क्यांनी वाढून ४,३१,६२४.८ कोटी रुपये झाले. हे प्रामुख्याने सोन्याच्या प्रमाणात ५४.१३ टन वाढ आणि त्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे झाले.

बँकेचे उत्पन्न २२.७७%; खर्च ७.७६% ने वाढला

परकीय चलन व्यवहारांत सुमारे ३३ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हिशेबवहीचा आकार ७६.२५ लाख कोटी रुपयांनी वाढला. यातून १.११ लाख कोटी रुपये मिळाले. बँकेचे उत्पन्न २२.७७% आणि खर्च ७.७६ टक्क्यांनी वाढले आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक