Join us

'सुधारणेसाठी पुरेसा वेळ...'; Paytm बंदीवर RBI'च्या गव्हर्नरांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:45 IST

Paytm च्या पेमेंट्स बँकेवर आरबीआयने बंदी घातली आहे. यावर आता आरबीआयच्या गव्हर्नरांनी मोठे वक्तव्य केले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm च्या पेमेंट्स बँक सेवेवर कारवाई केली. त्यामुळे २९ फेब्रुवारीनंतर पेटीएमची सेवा बंद होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या.  याबाबत आता आरबीआयने एक मोठे वक्तव्य केले आहे. 

चलनविषयक धोरणाच्या घोषणेच्या वेळी, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, नियमनच्या कक्षेत येणाऱ्या कंपन्यांनी नियमनाचे गांभीर्य आणि प्रक्रियांचे पालन करणे अपेक्षित आहे. त्यांनी ग्राहकांच्या हिताचे रक्षण केले पाहिजे. त्यावेळी त्यांनी पेटीएमचे नाव घेतले नव्हते. त्यांचा सल्ला केवळ पेटीएमच्या संदर्भातच नव्हे तर इतर फिनटेक कंपन्यांच्या संदर्भातही आहे.

आशियातली सर्वांत श्रीमंत दहा कुटुंबे; पहिल्या दहात चार भारतीय ! 

आरबीआयचे गव्हर्नर काय म्हणाले?

आज आरबीआयची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आरबीआय गव्हर्नरांनी पेटीएमशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पेटीएमला सुधारण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र वारंवार नियम न पाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पेटीएमचे नाव न घेता ते म्हणाले, की, जर सर्व नियमांचे पालन केले असेल तर केंद्रीय बँक नियंत्रित कंपनीवर कारवाई का करेल? पेटीएम पेमेंट्स बँकेची बाब वैयक्तिक आहे. या प्रकरणात पेमेंट सिस्टमबद्दल काळजी करण्याची गरज नाही. RBI नेहमी नियमन कक्षेत येणाऱ्या कंपन्यांसह द्विपक्षीय क्रियाकलापांवर भर देते. 

कंपन्या योग्य पावले उचलतील याची खात्री करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जेव्हा कोणतीही बँक किंवा NBFC नियमनाशी संबंधित योग्य पावले उचलत नाही तेव्हा आम्ही त्यांच्यावर व्यवसायाशी संबंधित निर्बंध लादतो. एक जबाबदार नियामक असल्याने, आम्ही प्रणालीची स्थिरता, ठेवीदार आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण लक्षात घेऊन पावले उचलतो. पेटीएमबाबत केलेल्या कारवाईबाबत आरबीआय लोकांच्या चिंता दूर करेल. पुढील आठवड्यात याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न जारी केले जातील, असंही दास म्हणाले. 

टॅग्स :पे-टीएमभारतीय रिझर्व्ह बँक