Join us  

“अधिक रोजगार निर्मितीसाठी भारताला ८ टक्के वाढीची आवश्यकता”: रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 1:22 PM

Raghuram Rajan News: यावेळी त्यांनी आयफोनच्या पार्ट्सच्या निर्मितीचा संदर्भ दिला.

Raghuram Rajan News: जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसे आश्वासन दिले आहे. मात्र, देशात महागाई, रोजगारासह अन्य अनेक समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगातील अनेक उद्योग भारतात गुंतवणूक करण्यास तसेच उत्पादन करण्यास उत्सुक असून, भारतात जर अधिक रोजगार निर्मिती करायची असेल, तर ८ टक्के वाढीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले. 

एका कार्यक्रमात बोलताना रघुराम राजन म्हणाले की, चीन आणि व्हिएतनाम सारख्या उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपल्या कर्मचाऱ्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन सुसज्ज करावे लागेल. भारत मूल्य साखळीत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि याची काही चिन्हे दिसत आहेत. मात्र, संपूर्ण सेलफोन भारतात तयार व्हायला वेळ लागेल, असे रघुराम राजन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आयफोनच्या पार्ट्सच्या निर्मितीचा संदर्भ दिला.

आपल्याकडे मोठ्या संख्येने तरुण आहेत, ज्यांना रोजगाराची गरज आहे

भारताची सध्याची आर्थिक वाढ ६ ते ६.५ टक्क्यांनी इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे. परंतु रोजगारांच्या गरजेच्या तुलनेत असे वाटते की, हे अजूनही कमी आहे. देशाची लोकसंख्या आणि येथील रोजगाराची गरज लक्षात घेता ८ ते ८.५ टक्के आर्थिक वाढीची गरज आहे. आपणाला येथे रोजगाराच्या गरजेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास ही वाढ थोडी मंद दिसते, कारण आपल्याकडे मोठ्या संख्येने तरुण आहेत, ज्यांना रोजगाराची गरज आहे, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, बेरोजगारीचा उच्चांक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही चिंतेचा विषय आहे. भारताचा जीडीपी इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत जास्त आहे, परंतु लाखो लोकांसाठी पुरेसा रोजगार निर्माण करू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर १०.०५ टक्क्यांपर्यंत वाढला, जो दोन वर्षांतील सर्वोच्च आहे. HSBC च्या अंदाजानुसार, भारताला पुढील १० वर्षांत ७ कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याची गरज आहे आणि ७.५ टक्के वाढीद्वारे केवळ दोन तृतीयांश रोजगार समस्या सोडवल्या जातील, असे एका अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :रघुराम राजनभारतीय रिझर्व्ह बँक