ratan tata trusts : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रातील काही गोष्टी नुकत्याच समोर आल्या आहेत. यामध्ये त्यांची जुनी सहकारी मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावावरही सुमारे ५०० कोटी रुपयांची संपत्ती करण्यात आली आहे. सुत्रांनुसार, मोहिनी दत्ता यांनी ६५० कोटी रुपयांची मागणी कल्याचेही बोलले जात आहे. वास्तविक, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. दरम्यान, आता रतन टाटा यांची संपत्ती कोण सांभाळणार याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
रतन टाटा यांची संपत्ती सांभाळणाऱ्या ट्रस्टमध्ये बदल होणारज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये आता मोठा बदल होणार आहे. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन (RTEF) आणि रतन टाटा एंडॉवमेंट ट्रस्टची (RTET) पुनर्रचना केली जाणार आहे. यामध्ये त्यांची भावंडं शिरीन जेजीभॉय, डियान जेजीभॉय आणि नोएल टाटा हे नवीन विश्वस्त बनतील. हे दोन्ही ट्रस्ट रतन टाटा यांची संपत्ती सांभाळतात. या बदलामुळे टाटा समूहाच्या भविष्यातील धोरणांमध्ये टाटा कुटुंबाची भूमिका अबाधित राहील, तर ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कल्याणकारी उपक्रमांना अधिक बळकटी मिळेल.
टाटा समूहाची होल्डिंग असलेल्या टाटा सन्समध्ये रतन टाटा यांचा ०.८३% हिस्सा होता. याशिवाय टाटा डिजिटल, टाटा मोटर्स आणि टाटा टेक्नॉलॉजीजमध्येही त्यांची हिस्सेदारी होती, जी आता आरटीईएफकडे हस्तांतरित केली जाईल. त्यांची अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक होती, त्यापैकी काही आरटीईटीला निधी देण्यासाठी विकल्या जातील, तर काही थेट ट्रस्टकडे हस्तांतरित केल्या जातील. त्यांची एकूण संपत्ती १०,००० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी टाटा ट्रस्टचे विश्वस्त शिरीन जेजीभॉय, डियान जेजीभॉय, दारियस खंबाटा आणि मेहली मिस्त्री करतील. मिस्त्री वगळता बाकीचे सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे RTEF आणि RTET च्या बोर्डाचा भाग आहेत.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य राहीलरतन टाटा आपल्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. टाटा समूहाचे अनेक रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था प्रसिद्ध आहेत. मुंबईत कर्करोगावर उपाचर करणारे रुग्णालय तर सर्वांनाच माहिती आहे. या कार्यात कुठलाही खंड पडणार नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. आरटीईएफ आणि आरटीईटी दोन्ही संस्था शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या विकासावर तसेच समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीवर काम करतील.