Join us  

झुनझुनवालांच्या या कंपनीच्या IPO तून मिळू शकते कमाईची संधी, सोबत येणार आणखी एक IPO; जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 6:10 PM

फुटवेअर किरकोळ विक्रेता कंपनी मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने मंगळवारी सांगितले, की त्यांचा IPO 10 डिसेंबरपासून खुला होईल आणि 14 डिसेंबरपर्यंत खुला राहील.

नवी दिल्‍ली - राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे समर्थन असलेल्या मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने 10 डिसेंबर रोजी खुल्या होणाऱ्या आपल्या 1,368 कोटी रुपयांच्या IPO साठी प्रति शेअर 485 ते 500 रुपये एवढी किंमत श्रेणी ठेवली आहे. तर दुसरीकडे, फार्मास्युटिकल मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेसचा 1,398 कोटी रुपयांचा IPO 13 डिसेंबर रोजी खुला होईल. कंपनीने IPO साठी किंमत श्रेणी 780 ते 796 रुपये प्रति शेअर एवढी ठेवली आहे.

फुटवेअर किरकोळ विक्रेता कंपनी मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने मंगळवारी सांगितले, की त्यांचा IPO 10 डिसेंबरपासून खुला होईल आणि 14 डिसेंबरपर्यंत खुला राहील.  तथापि, अँकर गुंतवणूकदारांसाठी 9 डिसेंबर रोजीच बोली खुली होईल. या IPO अंतर्गत 295 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, प्रवर्तक आणि इतर भागधारक 2.14 कोटी शेअर्स विक्री करतील.

या IPO द्वारे कंपनीचे प्रवर्तक त्यांचे सुमारे 10 टक्के स्टेक विकतील. सध्या कंपनीमध्ये प्रवर्तक आणि प्रवर्तक गट यांचा 84 टक्के हिस्सा आहे. कंपनीने आयपीओचा अर्धा भाग पात्र संस्थागत खरेदीदारांसाठी, 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवला आहे. कंपनी या IPO मधून मिळणारे उत्पन्न मेट्रो, कोब्बलर, वॉकवे आणि क्रोक्स ब्रँड्स अंतर्गत नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी वापरेल. सध्या कंपनीचे देशातील 36 शहरांमध्ये 598 स्टोअर्स आहेत. यांपैकी गेल्या तीन वर्षांत 211 दुकाने सुरू झाली आहेत.

दुसरीकडे, फार्मास्युटिकल MedPlus हेल्थ सर्व्हिसेस 1,398 कोटी रुपयांचे IPO 13 डिसेंबर रोजी खुले करेल. कंपनीने IPO साठी किंमत श्रेणी 780 ते 796 रुपये प्रति शेअर ठेवली आहे. कंपनीने मंगळवारी सांगितले, की तीन दिवसांचा हा IPO 15 डिसेंबर रोजी बंद होईल. तसेच अँकर गुंतवणूकदारांसाठी 10 नोव्हेंबर रोजी बोली खुली होईल. IPO अंतर्गत 600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक 798.30 कोटी रुपयांच्या समभागांच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) देतील.

कंपनीने आपला OFS आकार 1,038.71 कोटींवरून 798.30 कोटी रुपयांपर्यंत कमी केला आहे. यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 5 कोटी रुपयांचे शेअर्स राखीव ठेवण्यात येणार आहेत. कर्मचार्‍यांना फायनल किंमतीतून प्रति शेअर 78 रुपयांची सूटही मिळेल.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजारशेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग