IRCTC Tour Package : तुम्हाला प्रयागराज येथे कुंभ मेळ्याला जाता आलं नसेल तर काळजी करू नका. कारण, भारतीय रेल्वेने शिवभक्तांसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही अवघ्या २० हजार रुपयांमध्ये ५ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करू शकता. भारतीय रेल्वे धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालवत आहे. या अंतर्गत, रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने शिर्डी साईबाबांसह देशातील अनेक ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी पॅकेज सादर केले आहे. ही विशेष यात्रा २५ मार्च ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत चालणार आहे. या धार्मिक प्रवासाचे किमान भाडे प्रति व्यक्ती २०,७०० रुपये आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. हा आध्यात्मिक ट्रेनचा प्रवास २५ मार्च २०२५ रोजी रीवा येथून सुरू होऊन ४ एप्रिल रोजी रीवा येथे शेवट होणार आहे. हे पॅकेज १० रात्री आणि ११ दिवसांसाठी असणार आहे. रीवा रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त, प्रवासी सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, इटारसी, राणी कमलापती, शुजालपूर, इंदूर, देवास, उज्जैन आणि रतलाम स्थानकांवरून उतरू किंवा चढू शकतील. आयआरसीटीसी वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये
- पॅकेजचे नाव- द्वारका आणि शिर्डी यात्रेसह ज्योतिर्लिंग (WZBG41)
- टूर कालावधी- ११ दिवस/१० रात्री
- प्रवास मोड - भारत गौरव पर्यटक ट्रेन
- जेवणाचं काय? - सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या यात्रेत प्रवाशांना दिले जाणार आहे.
- प्रस्थान तारीख- २५ मार्च २०२५
टूरमध्ये काय काय पाहायला मिळणार
- द्वारका : द्वारकाधीश मंदिर, बेट द्वारका मंदिर आणि नागेश्वर महादेव ज्योतिर्लिंग मंदिर.
- सोमनाथ : सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर.
- नाशिक : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर.
- शिर्डी : शिर्डी मंदिर.
- पुणे : भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर.
- छत्रपती संभाजीनगर : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर.
भाडे किती असेल?पॅकेजची किंमत श्रेणीनुसार असेल. हे पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला किमान २०,७०० रुपये द्यावे लागतील. तुम्ही स्लीपरमध्ये प्रवास केल्यास, तुम्हाला प्रति व्यक्ती किमान २०,७०० रुपये मोजावे लागतील. तुम्ही थर्ड एसी पॅकेज घेतल्यास, तुम्हाला प्रति व्यक्ती किमान ३४,६०० रुपये द्यावे लागतील. याशिवाय, फर्स्ट एसीमध्ये पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला किमान ४५,९०० रुपये खर्च करावे लागतील.