Join us  

CoronaVirus: तिकीट रिझर्व्हेशनसंदर्भात रेल्वेकडून स्पष्टीकरण; 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 3:14 PM

अशातच आरक्षण सुविधा १४ एप्रिलनंतरही बंदच ठेवणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यावर आता रेल्वेनंच स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्लीः देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक सेवा ठप्प झाल्या आहेत. लोकल रेल्वे, मेल एक्स्प्रेस गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत. रस्ते वाहतूकही बऱ्यापैकी थांबलेली आहे. अनेकांनी एप्रिल आणि मे महिन्याचं आधीपासूनच आरक्षण करून ठेवलेलं आहे. परंतु रेल्वेच बंद असल्यानं ते आरक्षणही स्थगित झालं आहे. १४ एप्रिलपर्यंत आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. पण रेल्वेनं आणखी एक आनंदवार्ता दिली आहे. अशातच आरक्षण सुविधा १४ एप्रिलनंतरही बंदच ठेवणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यावर आता रेल्वेनंच स्पष्टीकरण दिलं आहे. १४ एप्रिलनंतर रिझर्व्हेशनला कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही.१५ एप्रिल या तारखेपासून आरक्षण देण्यास कधीही बंदी नव्हती, असंही रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच १५ एप्रिलपासून आरक्षण करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयआरसीटीसी १५ एप्रिलपासून रेल्वे तिकिटांची बुकिंग सुरू करणार असून, ही सुविधा अंशतः कार्यान्वित होणार आहे. रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे रुळावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. सध्याच्या नियमांतर्गत आरक्षणाची सुविधा प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधी करण्यात येत होती. या नियमानुसार १५ एप्रिल आणि त्यापुढील प्रवासासाठी बुकिंग १२० दिवसआधीच करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत १५ एप्रिलनंतरही रेल्वे प्रवासासाठी आरक्षण करता येणार नसल्याची बातमी खोटी आहे. त्यात कोणतंही तथ्य नाही. १४ एप्रिलनंतर आरक्षण प्रणाली प्रवाशांसाठी उघडण्यात येणार असल्याचंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी २२ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली होती. पण मालवाहतूक गाड्या सामान्यपणे सुरू होत्या. आता रेल्वे प्रवासी सेवा हळूहळू १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही १ एप्रिलपासूनच रेल्वेनं देशभरात औषधे, आवश्यक घटक, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठीची सेवा सुरू करावी, असं आवाहनही केलं आहे. 

टॅग्स :आयआरसीटीसीरेल्वे प्रवासीरेल्वेकोरोना वायरस बातम्या