Join us  

रेल्वे प्रवाशांना मिळणार समुद्राचे शुद्ध केलेले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:49 AM

बंगालच्या उपसागराचे पाणी प्रक्रिया करून पिण्याचे पाणी म्हणून लवकरच रेल्वे स्थानके व रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

विशाखापट्टण - बंगालच्या उपसागराचे पाणी प्रक्रिया करून पिण्याचे पाणी म्हणून लवकरच रेल्वे स्थानके व रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.यासाठी भारतीय रेल्वेचे ‘आयआरसीटीसी’ हे महामंडळ आणि राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ (एनटीपीसी) यांच्यात अलीकडेच सामजस्य करार झाला. त्यानुसार समुद्राचे शुद्ध केलेले पाणी ‘एनटीपीसी’ बाटलीबंद पिण्याचे पाणी म्हणून रेल्वेला पुरवेल व ते ‘रेलनीर’च्या स्टॉलवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये विकले जाईल.‘एनटीपीसी’चे महाव्यवस्थापक (तांत्रिक सेवा) सरोज चेल्लुर यांनी सांगितले की, यासाठी महामंडळाच्या विशाखापट्टणजवळ सिम्हाद्री येथील औष्णिक विद्युत प्रकल्पात पथदर्शक संयंत्र उभारण्यात येईल. तेथे बंगालच्या उपसागरातून २,३०० टन खारे पाणी घेऊन त्यापासून दररोज १.२ लाख लिटर पिण्याचे शुद्ध पाणी तयार केले जाईल. यासाठी विद्युत निर्मितीच्या वेळी वाया जाणाऱ्या उष्णतेचा (वेस्ट हीट) उपयोग केला जाईल. हे पाणी बाटलीबंदही तेथेच केले जाईल. यासाठी केलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्या यशस्वी झाल्या असून सुध तयार केलेल्या पाण्यात कोणतीही हानीकारक रसायने शिल्लक राहात नसल्याचे सिद्ध झाले आहे. हे पाणी सन २०१९च्या उन्हाळ््यापासून उपलब्ध होईल. मात्र त्याची नेमकी किंमत आत्ताच सांगता येणार नाही, असे चेल्लुर म्हणाले. अशा प्रकारे समुद्राच्या पाण्याचा शुद्ध करून पिण्याचे पाणी म्हणून सार्वजनिक वापर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :पाणीभारतीय रेल्वेभारत