Join us  

रशिया-युक्रेन युद्धाचा वाईट परिणाम होईल, महागाई दीर्घकाळ सतावणार - रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 5:01 PM

Raghuram Rajan : युद्धामुळे महागाईचा ताण वाढणार आहे. महागाईविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. ही चांगली बातमी नाही, असे रघुराम राजन म्हणाले.

नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे (Russia-Ukraine War) भारतासह जगभरात महागाई (Inflation) वाढेल आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावेल. देशांना त्यांचा विकास टिकवणे कठीण होईल, असे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी म्हटले आहे. कच्चे तेल, गहू यासह अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये महागाई आधीच जास्त होती. यात रशिया-युक्रेन युद्धाची भर घातली तर महागाई आणखी वाढेल आणि विकास कमी होईल. दोन्हीचा मिळून महागाईवर परिणाम होईल, असे रघुराम राजन यांनी सीएनबीसी-टीव्ही 18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.   

अमेरिका आणि युरोपमध्ये अशी परिस्थिती दिसून येत आहे. युद्धामुळे महागाईचा ताण वाढणार आहे. महागाईविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. ही चांगली बातमी नाही, असे रघुराम राजन म्हणाले. याचबरोबर, अमेरिका आणि इतर देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांच्या परिणामाबाबत रघुराम राजन म्हणाले की, या निर्बंधांचे गंभीर परिणाम होतील. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे पाश्चात्य देश एकवटले आहेत. जपानही त्यांच्यासोबत आहे. पाश्चात्य देशांना निर्बंध कठोरपणे लागू करायचे आहेत. या निर्बंधांचा नक्कीच परिणाम होईल. रशिया हा ऊर्जेसह अनेक वस्तूंचा प्रमुख निर्यातदार आहे. रशियावरील निर्बंधांमुळे त्यांचा पुरवठा खंडित होईल. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार आहे, असे दिसून येते. 

याचबरोबर, पुरवठ्याच्या इतर स्त्रोतांचा वापर करून हा तोटा कमी केला जाऊ शकतो. कच्च्या तेलासाठी (Crude Oil) व्हेनेझुएला आणि इराणशी बोलणी सुरू आहेत. जर इराणमधून क्रूडचा पुरवठा सुरू झाला तर ही चांगली बातमी असेल. दुसरे, शेल एनर्जीमध्ये पुन्हा पाहिले जाईल. त्यामुळे पुढील काही महिन्यांत भाव वाढल्याने पुरवठ्याचे अन्य स्रोत वापरले जाऊ लागतील. वाढलेल्या किमतीमुळे मागणीही कमी होईल. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात रशियाचा मोठा हात आहे. जग सध्या कार्बन ऊर्जेवर खूप अवलंबून आहे, ते कमी करावे लागेल. रिन्यूएबल एनर्जीवर फोकस पुन्हा वाढू शकतो, असे रघुराम राजन यांनी सांगितले. 

टॅग्स :रघुराम राजनयुक्रेन आणि रशियामहागाई