Join us

दुकानांवर ‘क्विक’ संकट; १० मिनिटांत डिलिव्हरी ॲप्समुळे शहरांतील छोटे दुकानदार हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 15:28 IST

ब्लिंकिट (झोमॅटो), स्विगी इन्स्टामार्ट, झेप्टो, बीबीनाऊ (बिगबास्केट), फ्लिपकार्ट मिनट्ससारख्या ॲप्सची मोठ्या शहरांमध्ये प्रचंड चलती आहे...

पवन देशपांडे -

मुंबई : १० मिनिटांत घरबसल्या किराणा, फळे-भाज्या आणि इतर अनेक वस्तू मिळू लागल्याने शहरांतील छोट्या दुकानदारांवर नवे संकट आले आहे. दहा मिनिटांत मालाची घरपोच डिलिव्हरी देणाऱ्या क्विक कॉमर्स ॲप्सची संख्या वाढल्याने हे संकट गहिरे होत आहे. यात वर्षाकाठी ३० टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. 

ब्लिंकिट (झोमॅटो), स्विगी इन्स्टामार्ट, झेप्टो, बीबीनाऊ (बिगबास्केट), फ्लिपकार्ट मिनट्ससारख्या ॲप्सची मोठ्या शहरांमध्ये प्रचंड चलती आहे. हे ॲप्स विविध मालांवर सवलती देत असल्याने त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळेच शहरांमधील छोट-छोट्या दुकानांची विक्री घटली आहे. या ॲप्सनी अनेक शहरांत आपले डार्क स्टोअर्स सुरू केले आहेत. तिथून ते मालाचा थेट पुरवठा करत असल्याने दुकानदारांवर संकटाचे ढग आहेत. 

छोट्या दुकानदारांचे काय? : ॲप्ससमोर टिकाव धरायचा असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल. त्यासाठी सरकारने मदत करावी अशी मागणी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे. 

डार्क स्टोअर्स काय असतात? : ई-कॉमर्स कंपन्यांचे हे गोदाम असते. त्यातून ऑर्डर्सची पूर्तता केली जाते. ही गोदामे छोटी ते मध्यम आकाराची असतात व शहरात अनेक ठिकाणी असू शकतात. 

कोणाचे किती डार्क स्टोअर्स?ब्लिंकिट (झोमॅटो)     ७९१स्विगी इन्स्टामार्ट     ६०५ झेप्टो     ४७०बीबीनाऊ (बिगबास्केट)     ४००फ्लिपकार्ट मिनट्स     ४०

छोट्या दुकानांवर संकट कशामुळे? -ॲप्सच्या या डार्क स्टोअर्सला मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा फायदा होतो. ते जास्त माल कमी किमतीत खरेदी करू शकतात आणि ग्राहकांना अधिक सवलती देऊ शकतात. किराणा दुकाने किमतीच्या बाबतीत ही स्पर्धा करू शकत नाहीत, कारण त्यांचा नफा कमी असतो. 

डार्क स्टोअर्समध्ये पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम आणि सुव्यवस्थित असते. प्रगत तंत्रज्ञान आणि डेटा विश्लेषणाचा उपयोग करून आपले साठा व्यवस्थापन आणि वितरण प्रक्रिया जलद करतात. यामुळे त्यांना बहुतेक किराणा स्टोअर्सपेक्षा जास्त प्रकारची उत्पादने आणि जलद वितरण सेवा देणे शक्य होते. 

टॅग्स :व्यवसाय