Join us

‘कोटक’वर ऑनलाइन नवे ग्राहक जोडण्यास प्रतिबंध; आयटी नियमांच्या उल्लंघनाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 05:50 IST

आरबीआयच्या पूर्वपरवानगीने सुरु केलेल्या व्यापक बाह्य ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँकेवरील या निर्बंधांची समीक्षा करण्यात येणार आहे. 

मुंबई : कोटक महिंद्रा बँकेस ऑनलाइन व मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक जोडण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी बंदी घातली. बँकेला क्रेडिट कार्ड जारी करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आयटीविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई करण्यात आली असून, बंदी तत्काळ प्रभावाने लागू होणार आहे. याआधी २०२० मध्ये रिझर्व्ह बँकेने तंत्रज्ञानातील त्रुटींमुळे एचडीएफसी बँकेवर नवीन कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. नंतर मार्च २०२२ मध्ये ही बंदी हटविण्यात आली होती. आरबीआयने स्पष्ट केले की, बँकेला सध्याचे ग्राहक आणि क्रेडिट कार्डधारकांना नेहमीप्रमाणे सर्व सुविधा देता येतील. आरबीआयच्या पूर्वपरवानगीने सुरु केलेल्या व्यापक बाह्य ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँकेवरील या निर्बंधांची समीक्षा करण्यात येणार आहे. 

माहिती सुरक्षेत गंभीर उणिवा आढळल्यारिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे की, कोटक महिंद्रा बँकेचे आयटी जोखीम व्यवस्थापन आणि माहिती सुरक्षा संचालन यात ‘गंभीर उणिवा’ आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये बँकेच्या माहिती तंत्रज्ञान तपासात गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यात बँक सातत्याने अपयशी ठरली. त्यामुळे हे पाऊल रिझर्व्ह बँकेला उचलावे लागले.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक