Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्याला फरार गुन्हेगार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:08 IST

अनेक बँकांना अब्जावधींचा गंडा घालून विदेशात पळून गेलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांना फेरा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणात ‘फरार गुन्हेगार’ घोषित करण्याची

नवी दिल्ली : अनेक बँकांना अब्जावधींचा गंडा घालून विदेशात पळून गेलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांना फेरा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणात ‘फरार गुन्हेगार’ घोषित करण्याची प्रक्रिया दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने सुरू केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने यासंदर्भात न्यायालयात अर्ज केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.न्यायालयाने बजावलेले समन्स मल्ल्या टाळत आले आहेत. हजर होण्यासाठी त्यांना आता १८ डिसेंबरची अंतिम संधी देण्यात आली आहे.मल्ल्या यांच्या विरोधात नियमानुसार प्रक्रिया सुरू करण्यासाठी योग्य ती पावले उचला, असे निर्देश दिल्लीचे महानगर दंडाधिकारी दीपक शेहरावत यांनी ईडीला दिले आहेत. तत्पूर्वी, ईडीचे विशेष सरकारी वकील एन. के. मत्ता यांनी न्यायालयात सांगितले की, ‘मल्ल्या यांच्या विरुद्ध जारी करण्यात आलेले ओपन एंडेड अजामीनपात्र वॉरंट बजावले न गेल्यामुळे परत आले आहे. या पार्श्वभूमीवर मल्ल्या यांच्या विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ८२ आणि ८३ अन्वये कारवाई सुरू करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.’ कलम ८२ व ८३ अन्वये गुन्हेगारांना फरार घोषित केले जाते. न्यायालयाकडून मिळालेल्या निर्देशांनुसार आता ईडी पुढील कारवाई करील. मल्ल्या यांच्याविषयीची माहिती वृत्तपत्रांत जाहीर करण्यासाठी योग्य पावले उचलली जातील. १२ एप्रिल रोजी मल्ल्या यांच्या विरुद्ध ओपन एंडेड अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या ओपन एंडेड वॉरंटला कोणतीही कालमर्यादा नसते. अनेक महिन्यांनंतरही वॉरंट बजावले गेलेले नाही. त्यामुळे ईडीने न्यायालयात अर्ज केला होता.

टॅग्स :विजय मल्ल्या