Join us  

खनिज तेलाचा भाव 10 डॉलर्स प्रति बॅरल इतका घसरणार - तज्ज्ञांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 11:57 AM

पुढील सहा ते आठ वर्षांमध्ये खनिज तेलाचे भाव प्रति बॅरल 10 डॉलर्स इतके कोसळतील असं भाकीत लाँगव्ह्यू इकॉनॉमिक्सचे चीफ एग्झिक्युटिव्ह ख्रिस वॅटलिंग यांनी केले आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज वर्तवला आहे

ठळक मुद्देभविष्यामध्ये वीजेवर चालणाऱ्या गाड्या येतील आणि त्याच तेलाच्या किमती घटवायला कारणीभूत ठरतीलजगामध्ये वापरल्या जाणाऱ्या खनिज तेलापैकी 70 टक्के तेल वाहतूक क्षेत्रात वापरले जातेजून 2014 मध्ये खनिज तेलाची किंमत 120 डॉलर्स प्रति बॅरल होती, जी या घडीला 57.39 डॉलर्स प्रति बॅरल घसरली आहे

मुंबई - पुढील सहा ते आठ वर्षांमध्ये खनिज तेलाचे भाव प्रति बॅरल 10 डॉलर्स इतके कोसळतील असं भाकीत लाँगव्ह्यू इकॉनॉमिक्सचे चीफ एग्झिक्युटिव्ह ख्रिस वॅटलिंग यांनी केले आहे. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज वर्तवला आहे. तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर पुढील वर्षी सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी आयपीओ किंवा प्रारंभिक समभाग विक्री करत असल्याच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सौदीच्या अरमाकोमध्ये भांडवली गुंतवणूक करू शकणार आहेत.

तेलाचे भाव येत्या काही महिन्यांमध्येच कोसळतील असं नाही, असे सांगताना वॅटलिंग म्हणाले की भविष्यामध्ये वीजेवर चालणाऱ्या गाड्या येतील आणि त्याच तेलाच्या किमती घटवायला कारणीभूत ठरतील असे ते म्हणाले. जगामध्ये वापरल्या जाणाऱ्या खनिज तेलापैकी 70 टक्के तेल वाहतूक क्षेत्रात वापरले जाते, यावरून तेलाच्या किमती आणि वाहनांचा संबंध स्पष्ट होतो.

120 वर्षांपूर्वीपर्यंत खनिज तेल नव्हतं, हे आपण विसरलो का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक नेहमीच तेल राहिलेलं नाही हे त्यांनी दाखवून दिलं आहे. पर्यायी उर्जेला चालना मिळत आहे, आणि त्यामुळे खनिज तेलाची मागणी घसरत जाणार असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे येत्या सहा ते आठ वर्षांमध्ये खनिज तेलाचा भाव 10 डॉलर्स प्रति बॅरल म्हणजे आताच घसरलेल्या किमतींपेक्षा पाचपट स्वस्त झाला तर नवल वाटायला नको अशी वॅटलिंग यांची मागणी आहे.

दरम्यान, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने 2018मध्ये तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बाजारात तेलाचे साठे पडून आहेत, ओपेक सदस्यांव्यतिरिक्त अन्य देशही तेलाचं उत्पादन घेत आहेत आणि तेलाची मागणी वाढत नाहीये, या पार्श्वभूमीवर खनिज तेलाच्या किमती उतरलेल्याच राहतिल असा हा निष्कर्ष आहे. जून 2014 मध्ये खनिज तेलाची किंमत 120 डॉलर्स प्रति बॅरल होती, जी या घडीला 57.39 डॉलर्स प्रति बॅरल घसरली आहे.

टॅग्स :खनिज तेलवीजेवर चालणारं वाहन