Join us

पोस्ट ऑफिसची महिलांसाठी खास योजना, गुंतवणुकीवर मिळेल इतका परतावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:15 IST

Post Office scheme : सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणुकीची हमी देखील मिळते, यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना आहे. 

Post Office scheme : सध्या महिलांसाठी बचत योजना म्हणून अनेक योजना आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा सर्वसामान्यांसोबत महिलांसाठीही खास योजना आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करून बचत करता येते आणि सरकारी योजना असल्यामुळे गुंतवणुकीची हमी देखील मिळते, यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना आहे. 

महिला सन्मान बचत पत्र योजना ही भारत सरकारने सुरू केलेली एक विशेष बचत योजना आहे. ही योजना भारतात १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना बचतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणली गेली आहे. या योजनेत महिलांना खूप चांगले व्याज मिळते. ही योजना दोन वर्षांसाठी आहे. त्यात किमान एक हजार रुपये जमा करता येतील. तसेच, या योजनेत जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. 

या योजनेत, दर तीन महिन्यांनी खात्यात व्याज जमा केले जाते. महिला सन्मान बचत पत्र योजनेत गुंतवणूक करण्यासाठी महिलांना चांगले व्याज मिळते. सध्या या योजनेअंतर्गत दिला जाणारा व्याजदर वार्षिक ७.५ टक्के आहे. हे व्याज तिमाही आधारावर जमा केले जाते. महिला स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. जर १८ वर्षांखालील मुली असतील तर त्यांचे पालक त्यांच्यासाठी खाते उघडू शकतात. याशिवाय, पती आपल्या पत्नीसाठीही या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

योजनेवर कर मिळणार आहे का? महिला सन्मान बचत पत्र योजना देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. या योजनेत महिलांना कर सवलत देखील मिळते. आयकर कायदा ८०-सी अंतर्गत कर लाभ दिला जातो; मात्र योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो. याचा अर्थ या योजनेवर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर लाभ उपलब्ध नाही. व्याजावर टीडीएस कापला जातो.

टॅग्स :व्यवसाय