Post Office Investment Schems: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही गुंतवणुकीसाठी अनेक योजना आहेत. पोस्ट ऑफिस योजनेवर ही गॅरंटीड परतावा मिळतो. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit) म्हणजेच पोस्ट ऑफिस एफडी त्यापैकीच एक आहे. पोस्ट ऑफिसमध्ये १ ते ५ वर्षांच्या मुदतीच्या एफडीचे पर्याय उपलब्ध आहेत. मुदतीनुसार व्याजदर वेगवेगळे असतात.
पण पोस्ट ऑफिसमध्ये दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही एफडीचा पर्याय निवडू शकता. यामध्ये ५ वर्षांची एफडी तुमची गुंतवणूक तिप्पट करू शकते. तुम्ही त्यात जेवढी रक्कम गुंतवता, त्यातील दुप्पट रक्कम तुम्हाला व्याजातूनच मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. पोस्ट ऑफिसच्या एफडीवर मुद्दलातून दुप्पट व्याज मिळवण्याचा मार्ग काय आहे हे जाणून घेऊ.
जाणून घ्या काय करावं लागेल
पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे पैसे तिप्पट करण्यासाठी तुम्हाला ५ वर्षांची एफडी निवडावी लागेल. या एफडीवरील व्याजदर सध्या ७.५ टक्के आहे. आपल्याला या योजनेत गुंतवणूक करावी लागेल आणि ती मॅच्युअर होण्यापूर्वी ती वाढवावी लागेल. हे एक्सटेन्शन तुम्हाला सलग २ वेळा करावं लागेल, म्हणजेच तुम्हाला ही एफडी १५ वर्षे चालवावी लागेल.
५ लाखांच्या गुंतवणुकीवर १० लाखांहून अधिक व्याज
जर तुम्ही या एफडीमध्ये ५ लाख रुपये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदरानं तुम्हाला 5 वर्षात या रकमेवर २,२४,९७४ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे एकूण रक्कम ७,२४,९७४ रुपये होईल. पण जर तुम्ही या योजनेला ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली तर तुम्हाला फक्त व्याज म्हणून ५,५१,१७५ रुपये मिळतील आणि १० वर्षांनंतर तुमची एकूण रक्कम १०,५१,१७५ रुपये होईल. ते मॅच्युअर होण्यापूर्वी आपल्याला ते आणखी एकदा वाढवावं लागेल. यामध्ये १५ व्या वर्षी तुम्हाला फक्त व्याज म्हणून १०,२४,१४९ रुपये मिळतील. अशा प्रकारे 15 वर्षांनंतर तुम्हाला मूळ रकमेसह एकूण १५,२४,१४९ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला तिप्पट रक्कम मिळेल, ज्यात तुम्हाला फक्त व्याजातून दुप्पट कमाई होईल.
१ वर्षाच्या पोस्ट ऑफिस एफडीला मॅच्युरिटीच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत, २ वर्षांच्या एफडीला मॅच्युरिटी पीरियडच्या १२ महिन्यांच्या आत, तसंच ३ आणि ५ वर्षांच्या एफडीला मॅच्युरिटी पीरिअडच्या १८ महिन्यांच्या आत मुदतवाढ दिली जाऊ शकते. याशिवाय खातं उघडताना मॅच्युरिटीनंतर अकाऊंट एक्सटेन्शनची विनंतीही करू शकता. मॅच्युरिटीच्या दिवशी संबंधित टीडी खात्यावर लागू होणारा व्याजदर वाढीव कालावधीसाठी लागू असेल.
उर्वरित पोस्ट ऑफिस एफडीवर किती व्याज?
पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या एफडीवर वेगवेगळे व्याज मिळतं. १ वर्षाच्या एफडीवर ६.९० टक्के, २ वर्षांच्या एफडीवर ७.०० टक्के, ३ वर्षांच्या एफडीवर ७.१० टक्के आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५० टक्के वार्षिक व्याज दर आहे.