Join us  

Post Office ची 'ही' गॅरंटीड स्कीम करेल पैसे दुप्पट; केवळ १००० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 1:26 PM

ज्यांना नफाही हवा असतो सुरक्षित गुंतवणूकही हवी असते अशा लोकांसाठी पोस्टाची ही स्कीम अतिशय फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

कोणतीही व्यक्ती नफा पाहून कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात करते. काही लोक नफ्याच्या शोधात जोखीम पत्करण्यास तयार असतात, तर काही लोकांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायला आवडते जिथे त्यांची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते आणि त्यांना खात्रीशीर नफाही मिळतो. जर तुम्ही अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल ज्यांना सुरक्षित आणि हमी परताव्यासह योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते, तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या स्कीम्सचा समावेश करू शकता. आम्ही तुम्हाला आज पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (Post Office Kisan Vikas Patra) या स्कीमबद्दल सांगत आहोत. ही एक अशी स्कीम आहे जी तुमच्या गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याची हमी देते. या योजनेचे सर्व फायदे जाणून घेऊ. 

११५ महिन्यांत गुंतवणूक दुप्पट 

पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र स्कीम कोणत्याही गुंतवणूकदाराला ११५ महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करण्याची हमी देते. सध्या या योजनेत वार्षिक ७.५ टक्क्यांचं चक्रवाढ व्याज मिळतं. चांगली गोष्ट अशी आहे की या योजनेत एखादी व्यक्ती १००० रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकते आणि कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात. 

कोण उघडू शकतं खातं? 

किसान विकास पत्र हे नाव ऐकलं की असं वाटतं की ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच सुरू करण्यात आली आहे. वास्तविक, ही योजना १९८८ मध्ये सुरू करण्यात आली होती, जेव्हा त्याचा उद्देश शेतकऱ्यांची गुंतवणूक दुप्पट करण्याचा होता, परंतु आता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. आता कोणतीही प्रौढ व्यक्ती सिंगल किंवा जॉईंट अकाऊंट उघडू शकते. याशिवाय १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल त्याच्या/तिच्या नावावर किसान विकास पत्र घेऊ शकते. खातं उघडताना, आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, KVP अॅप्लिकेशन फॉर्म इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते. एनआरआय या योजनेसाठी पात्र नाही. 

पैसे काढण्यासाठी नियम काय? 

किसान विकास पत्र खात्यात पैसे जमा केल्याच्या तारखेपासून २ वर्षे आणि ६ महिन्यांनंतर मुदतपूर्व काढता येतात. परंतु, यासाठी काही अटी लागू आहेत, त्या पुढीलप्रमाणे आहेत-

  • केव्हीपी धारक किंवा संयुक्त खात्याच्या बाबतीत, कोणत्याही किंवा सर्व खातेदारांच्या मृत्यूनंतर
  • गॅझेट ऑफिसरच्या बाबतीत गहाण ठेवलेल्याकडून जप्तीवर
  • न्यायालयाच्या आदेशावर
टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक