Join us  

नरेंद्र मोदींकडून बँकांना मंत्र! 'या' क्षेत्रांना कर्ज वाटप करण्याचा दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 6:06 PM

Narendra Modi : ‘Financing for Growth & Aspirational Economy’ या विषयावर आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्प-2022 च्या तरतुदींची लवकर अंमलबजावणी करण्याचे सुचवले आहे.

नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी विकास दर वेगाने वाढवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. पंतप्रधानांनी जलद विकास दर गाठण्याचा आणि अर्थव्यवस्थेला महामारी-महागाईच्या दबावातून बाहेर काढण्याचा मंत्र दिला आहे. वेगवान आर्थिक वाढीसाठी बँकांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘Financing for Growth & Aspirational Economy’ या विषयावर आयोजित व्हर्च्युअल कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्प-2022 च्या तरतुदींची लवकर अंमलबजावणी करण्याचे सुचवले आहे. तसेच, बँकांना आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "ग्रामीण भागाशी संबंधित व्यवसायांना शक्य तितकी आर्थिक मदत द्या. याशिवाय, शून्य कार्बन उत्सर्जन, आरोग्य पायाभूत सुविधा, निर्यात आणि स्टार्टअपसारख्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्याची गरज आहे."

ग्रामीण भागावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "बँकांनी सेंद्रिय शेतीशी संबंधित व्यवसायांना तातडीने कर्ज द्यावे. याशिवाय मधमाशी पालन, गोदाम, अन्न प्रक्रिया आणि कृषी उत्पादनांची वाहतूक या व्यवसायांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण क्षेत्र पुढे जाईल. या क्षेत्रांच्या विकासामुळे आपण जगातील चॅम्पियन खेळाडू बनू शकतो. याचा सरळ अर्थ असा की, ग्रामीण क्षेत्राला चांगली आर्थिक मदत मिळाल्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल." 

याचबरोबर, "स्टार्टअप्स, निर्यात आणि रिन्यूव्हेबल एनर्जी संबंधीत नवीन उद्योगांना मदतीची गरज आहे. हे उद्योग पुढे नेण्यासाठी बँकांना मोठी भूमिका बजावावी लागेल. हे केवळ कोविड प्रभावित अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करेल असे नाही तर लाखो नवीन रोजगार देखील निर्माण करेल. आत्मनिर्भर भारत ही मोहीम बँकांच्या जोरावरच पूर्ण होऊ शकते", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

'ही क्षेत्रे गेम चेंजर ठरू शकतात'दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही क्षेत्रांचे वर्णन विकासाचे गेम चेंजर म्हणून केले. ते म्हणाले, "अंतराळ आणि भू-स्थानिक क्षेत्रात ड्रोन्सचा आधार घेतल्यास ते गेम चेंजर ठरू शकतात. या क्षेत्रात जगातील टॉप-3 देशांमध्ये येण्याचे स्वप्न आपण का पाहू नये. ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या संस्था सहकार्य करणार नाहीत का? खेड्यापाड्यातील उत्पादने वाढवून जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी मदत केली पाहिजे."

टॅग्स :नरेंद्र मोदीबँक