Join us  

PhonePe : जर तुम्हीही फोनपेद्वारे मोबाईल रिचार्ज करत असाल तर द्यावे लागतील जास्तीचे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 3:56 PM

PhonePe : डिजिटल पेमेंट अॅप फोनपेने 50 रुपयांपेक्षा जास्त मोबाईल रिचार्जसाठी व्यवहार प्रक्रिया शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, जी UPI द्वारे रिचार्जसाठी देखील लागू होईल.

नवी दिल्ली : जर तुम्हीही मोबाईल रिचार्जसाठी फोनपे (PhonePe) वापरत असाल तर तुम्हाला ही बातमी धक्का देणारी आहे. ऑनलाइन पेमेंट अॅप्लिकेशन फोनपे हे UPI आधारित व्यवहारांसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात करणारे देशातील पहिले अॅप आहे. (Phonepe Start Charging Fee For Mobile Recharge Know How Much Fee On Which Recharge)

डिजिटल पेमेंट अॅप फोनपेने 50 रुपयांपेक्षा जास्त मोबाईल रिचार्जसाठी व्यवहार प्रक्रिया शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे, जी यूपीआयद्वारे (UPI) रिचार्जसाठी देखील लागू होईल. कंपनीने म्हटले आहे की,  फोनपे 50 रुपयांपेक्षा कमी मोबाइल रिचार्जसाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. मात्र, 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जसाठी 1 रुपये शुल्क आणि 100 रुपयांपेक्षा वरील मोबाईल रिचार्जसाठी ग्राहकांकडून 2 रुपये शुक्ल आकारले जाणार आहे.

"रिचार्ज वर, आम्ही खूप लहान प्रमाणात प्रयोग करत आहोत, जेथे काही युजर्स मोबाईल रिचार्जसाठी पेमेंट करत आहेत. 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 50 ते 100 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये आणि 100 रुपयांच्या रिचार्जवर 2 रुपये आकारले जातात. मूलत: प्रयोगाचा एक भाग म्हणून, बहुतेक युजर्स एकतर काहीही पेमेंट करत ​​नाहीत किंवा 1 रुपयाचे पेमेंट करत आहेत", असे फोनपेकडून सांगण्यात आले.

फोनपेच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही शुल्क आकारणारे एकमेव प्लेअर किंवा पेमेंट प्लॅटफॉर्म नाही. बिल पेमेंटवर थोडे शुल्क आकारणे आता एक स्टँडर्ड इंटस्ट्री प्रॅक्टिस आहे आणि इतर बिलर वेबसाइट आणि पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे देखील केले जाते. आम्ही फक्त क्रेडिट कार्ड पेमेंटवर प्रक्रिया शुल्क (इतर प्लॅटफॉर्मवर याला सेवा शुल्क म्हणतात) आकारतो.

300 मिलियनहून अधिक रजिस्टर्ड युजर्सथर्ड पार्टी अॅप्समधील यूपीआय (UPI) व्यवहारांच्या बाबतीत फोनपेचा सर्वात मोठा वाटा आहे. कंपनीने सप्टेंबरमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटींहून अधिक यूपीआय व्यवहार नोंदवले होते, ज्यामध्ये अॅप सेगमेंटचा हिस्सा 40%पेक्षा जास्त होता. फोनपेची स्थापना 2015 मध्ये फ्लिपकार्टचे माजी अधिकारी समीर निगम, राहुल चारी आणि बुर्जिन इंजिनिअर यांनी केली होती. डिजिटल पेमेंट अॅपमध्ये 300 मिलियनहून अधिक रजिस्टर्ड युजर्स आहेत.

टॅग्स :ऑनलाइनमोबाइलतंत्रज्ञान