Join us  

पेट्रोल, डिझेलच्या किमतींनी गाठला उच्चांक, मुंबईत पेट्रोल 84.07  रुपये प्रति लिटर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 9:31 PM

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून, मुंबईसह अन्य महानगरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 84.07  रुपये इतक्या रेकॉर्ड पातळीवर पोहोचला आहे.  

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून, मुंबईसह अन्य महानगरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 84.07  रुपये इतक्या रेकॉर्ड पातळीवर पोहोचला आहे.  सध्याच्या दरांनुसार मुंबईत सर्वाधिक महाग पेट्रोल मिळत असून, देशामध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल गोव्यामधील पणजी येथे मिळत आहे. पणजीमध्ये आजचा पेट्रोलचा दर 70.26 रुपये प्रति लिटर एवढा आहे.   कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामधील दैनंदिन वाढीस स्थगिती देण्यात आली होती. मात्र निवडणुक प्रक्रिया आटोपल्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आली तेव्हापासून, पेट्रोला आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 76.24 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 79.13 आणि कोलकाता येथे 76.24  एवढा आहे. तर मुंबईत डिझेलची किंमत 71.94 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. दरम्यान,  देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत असतानाच डिझेल आणि पेट्रोलवरील कर कमी होणार नसल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार पावले उचलेल अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ते म्हणाले, "ओपेक देशांनी घटवलेले उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींनी घेतलेली उसळी यामुळे तेलाचे दर वाढले आहेत. या दरवाढीमुळे मध्यम वर्गाला अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची मला जाणीव आहे. भारत सरकार यावर तोडगा काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल." मात्र सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार नेमके काय करणार याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही.   

टॅग्स :पेट्रोलभारत