Join us  

पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, तरी काहीच कसे वाटेना? आंदोलन करणाऱ्या संघटनांची चुप्पी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 7:58 AM

मागील वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनियंत्रित वाढ झाली आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होतो. त्यामुळे त्याची थेट झळ सर्वसामान्यांना बसते.

नवी मुंबई : कोरोनामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीही वधारल्या आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. विशेष म्हणजे डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीविरोधात नेहमी गळा काढणाऱ्या सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी यावेळी चुप्पी साधल्याचे दिसून आले आहे.मागील वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनियंत्रित वाढ झाली आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होतो. त्यामुळे त्याची थेट झळ सर्वसामान्यांना बसते. इंधन दरवाढीमुळे बाजारपेठांवर परिणाम झाला आहे. प्रवासी वाहतूक करणारी वाहने, ऑटोरिक्षा, टॅक्सी तसेच कृषी मालाची नेआण करणारी वाहन चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्याच्या डिझेल दरवाढीचा वाहतूक व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. इंधन दरवाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढतो. परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढतात. मागील वर्षभरात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूसुध्दा महाग झाल्या आहेत. याची सर्वाधिक झळ सर्वसामान्य वर्गाला बसत आहे. विशेष म्हणजे एरवी इंधनाची अल्पशीही दरवाढ झाली तरी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून ओरड केली जाते. यावेळी मात्र कोणीही विरोध केल्याचे दिसत नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने आंदोलन छेडल्याचे ऐकिवात नाही. सरकारसुध्दा इंधन दरवाढीच्या मुद्द्याला सोयीस्करपणे बगल देताना दिसत आहे. यात वाहतूकदार, सर्वसामान्य कष्टकरी वर्ग भरडले जात आहेत. 

दरवाढीने सर्वसामान्यांना फटका -पेट्रोल व डिझेल दरवाढीचा मोठा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वधारल्या आहेत. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही त्याची छळ बसेत. उत्पादनाचा खर्च आवाक्यात असला तरी वाहतुकीचा खर्च वाढल्याने उत्पादक आणि खरेदीदार यांच्यात आर्थिक दरी निर्माण होत आहे. या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य उपभोक्ता भरडला जाण्याची शक्यता आहे.

बहुतांश रिक्षा चालकांनी रिक्षा चालविणे बंद केले आहे. यामुळे त्यांची उपासमार होत आहे. 

सात-आठ वर्षांपूर्वी इंधनाच्या दरात किंचितही वाढ झाली तरी विरोधकांकडून ओरड केली जात असे. परंतु मागील काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनियंत्रितपणे वाढ होत आहे. एकीकडे वाहतूकदारांना करमाफी जाहीर करायची आणि दुसरीकडे इंधनाचे दर वाढवायचे, असा दुहेरी खेळ सध्याचे सरकार खेळत आहे. त्यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. प्रफुल म्हात्रे (कामगार नेते)प्रतिक्रियापेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा थेट फटका जीवनावश्यक वस्तूंना बसला आहे. भाजी व अन्नधान्यांच्या किमतीत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसाधारण कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.- लक्ष्मी अय्यर (गृहिणी)कोरोनामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झालेले आहे. विशेषत: वाहतूक व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अशातच इंधनाची दिवसाआड होणारी दरवाढ वाहतूकदारांच्या मुळावर बेतणारी ठरली आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्रांशी समन्वय साधून इंधनचे दर कमी करावेत, अशी आमची मागणी आहे.संकेत डोके (वाहतूकदार)

टॅग्स :पेट्रोलडिझेलपैसा