Join us  

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 5:12 AM

‘ओपेक’ची उत्पादन कपात कायम; कच्चे तेल महागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तेल उत्पादक व निर्यातदार, तसेच त्यांचे मित्र देश (ओपेक प्लस) यांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनातील कपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, भारतात पेट्रोलडिझेलचे दर शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

भारतात मागील सहा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. शेवटची दरवाढ गेल्या शनिवारी करण्यात आली होती. ओपेक प्लस देशांनी गुरुवारी कच्च्या तेलातील उत्पादन कपात एप्रिल २०२१ पर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर आणखी वाढू शकतात. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होईल. सध्या भारतातील इंधन दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपये लिटर, तर डिझेल ८८.६० रुपये लिटर आहे. दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्यात पेट्रोल अनुक्रमे ९१.१७ रुपये, ९३.११ रुपये आणि ९१.३५ रुपये लिटर, तर डिझेल अनुक्रमे ८१.४७, ८६.४५ आणि ८४.३५ रुपये लिटर आहे.

ओपेकच्या निर्णयाचा आर्थिक सुधारणेवर परिणामदरम्यान, ओपेक प्लस देशांच्या निर्णयाचा काही देशांच्या अर्थव्यवस्थांतील सुधारणेवर परिणाम होईल, असे भारत सरकारने म्हटले आहे. ओपेके व मित्र देशांनी उत्पादन कपात सुरू केल्यापासून कच्च्या तेलाच्या दरांत आधीच ३३ टक्के वाढ झाली आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, प्रमुख तेल वापरकर्ता देश म्हणून भारताला अशा निर्णयांची चिंता वाटते. त्यामुळे तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांतील अर्थव्यवस्थांच्या सुधारणेस धक्का बसू शकतो.

टॅग्स :इंधन दरवाढपेट्रोलडिझेल