Join us  

निवडणूक संपताच पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू, नऊ दिवसांत ७० ते ८० पैशांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:05 AM

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच पेट्रोल आणि डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांत प्रति लिटर ७० ते ८० पैशांनी इंधनाचे दर वाढले आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच पेट्रोल आणि डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसांत प्रति लिटर ७० ते ८० पैशांनी इंधनाचे दर वाढले आहेत. २० मेपासून दर वाढत आहे. गेल्या नऊ दिवसांत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८३ पैशांनी आणि डिझेलचे दर ७३ पैशांनी वाढले आहेत, असे सरकारी तेल विपणन कंपन्यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव वाढलेले असतांनाही एप्रिल आणि मे दरम्यान दर आटोक्यात होते. मंगळवारी पेट्रोल ११ पैशांनी, तर डिझेल प्रति लिटर ५ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७१ रुपये ८६ पैसे झाला आहे. १९ मे रोजी दर ७१ रुपये ०३ पैसे होता. तसेच डिझेलचा दर ६६ रुपये ६९ पैसे झाला असून १९ मे रोजी दर ६५ रुपये ९६ रुपये होता. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७७ रुपये ४७ पैसे आणि डिझेलचा दर ६९ रुपये ८८ पैसे झाला आहे.

इंडियन ऑईल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या सरकारी विपणन कंपन्यांनी निवडणुकीदरम्यान दर स्थिर ठेवले होते. ग्राहकांवर बोझा पडू नये म्हणून निवडणुकीनंतर दर थोडी वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव प्रति बॅरल ५ अमेरिकन डॉलरने वाढलेले असतांना मे २०१८ मध्ये कर्नाटकातील निवडणुकीच्या आधी १९ दिवस या कंपन्यांनी दर गोठविले होते.

 

टॅग्स :पेट्रोल पंपपेट्रोलडिझेल