Join us

Petrol Diesel Price Today: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांचा मोठा निर्णय! आजचा पेट्रोल-डिझेलचा दर काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 09:32 IST

Petrol Diesel Price Today: सन २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी संपूर्ण देशभरात १०० रुपयांचा स्तर ओलांडला आणि देशवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

नवी दिल्ली: सन २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी संपूर्ण देशभरात १०० रुपयांचा स्तर ओलांडला आणि देशवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. नाही म्हणायला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत इंधनदर स्थिर होते. मात्र, त्यानंतर दरांमध्ये सातत्याने वाढ होत राहिली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी सामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

पेट्रोलियम कंपन्यानी सलग ५७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत १ टक्का घसरण आली. ब्रेंट क्रूडचा भाव ७९.१० डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ०.५४ टक्क्यांनी वधारला आणि तो ७५.९८ डॉलर झाला. क्रूडमध्ये झालेली भाववाढ ही वर्षभरातील सर्वाधिक वाढ नोंदवण्याचा दिशेने कच्च्या तेलाने वाटचाल केली. २००९ नंतर एका वर्षात कच्च्या तेलाचा भाव ५७ टक्के आणि ब्रेंट क्रूडचा भाव ५३ टक्क्यांनी वधारला.

मुंबईतील पेट्रोलचा आजचा दर काय?

मुंबईत आजचा एक लीटर पेट्रोलचा दर १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे.

देशातील प्रमुख शहरांतील डिझेलचा भाव काय?

मुंबईत आज एक लीटर डिझेलचा दर ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून, कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.

दरम्यान, देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आताच्या घडीला सार्वकालिक उच्चांकावर असून, भोपाळमध्ये सर्वाधिक इंधन दर आहेत. पंतप्रधान मोदींनी काही प्रमाणात इंधनदरावरील टॅक्स कमी करून देशवासीयांना मोठी भेट दिली होती. त्यानंतर संबंधित राज्यांनी आपापल्या राज्यातील टॅक्स कमी करून पेट्रोल आणि डिझेलदराबाबत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :पेट्रोलडिझेल