Join us

सरकारी बँकेने आणल्या २ नवीन एफडी योजना! नवीन वर्षात गुंतवणुकीची संधी; किती असेल व्याजदर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:58 IST

New FD : तुम्ही सरकारी हमी असलेला सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सरकारी बँकेने २ नवीन एफडी योजना लाँच केल्या आहेत.

New FD : नवीन वर्षात अजूनही तुम्ही गुंतवणुकीचा श्रीगणेशा केला नसेल तर एक संधी चालून आली आहे. मुदत ठेव (FD) हा दीर्घकाळापासून सामान्य माणसाचा आवडता गुंतवणूक पर्याय राहिला आहे. लोकांचे हित लक्षात घेऊन सरकारी आणि खासगी बँकाही आकर्षक एफडी योजना सुरू करत असतात. आता पंजाब नॅशनल बँकेने २ नवीन कालावधीच्या मुदत ठेवी सुरू केल्या आहेत. ३०३ दिवस आणि ५०६ दिवसांच्या मुदत ठेवींमध्ये ३ कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते.

पंजाब नॅशनल बँकेच्या नवीन एफडीमध्ये ३०३ दिवसांच्या मुदतीत पैसे जमा करणाऱ्या गुंतवणूकदारांना ७ टक्के व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, ५०६ दिवसांच्या कालावधीसाठी व्याज दर ६.७ टक्के आहे. हे नवीन व्याजदर १ जानेवारी २०२५ पासून लागू झाले आहेत. या दोन्ही एफडीमध्ये पैसे गुंतवल्यास ज्येष्ठ नागरिक आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ३०३ दिवसांच्या FD मध्ये ७.5५ टक्के आणि ५०६ दिवसांच्या FD मध्ये ७.२ टक्के व्याज दिले जाईल. पंजाब नॅशनल बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना ३०० दिवसांच्या मुदतीवर ७.८५ टक्के आणि ५०६ दिवसांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे.

सामान्य ग्राहकांसाठी ३.५०% ते ७.२५% पर्यंत व्याजपंजाब नॅशनल बँक सामान्य नागरिकांसाठी ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत FD ऑफर करते. बँकेचा व्याज दर ३.५०% ते ७.२५% पर्यंत आहे. सर्वाधिक व्याज दर ७.२५% असून तो ४०० दिवसांच्या कालावधीच्या FD वर उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, पीएनबी ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडी वर ४% ते ७.७५% व्याज देत आहे. ४०० दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर सर्वाधिक ७.७५% व्याज उपलब्ध आहे.

सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी (८० वर्षे आणि त्यावरील) पंजाब नॅशनल बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या एफडीवर ४.३०% ते ८.०५% व्याज देत आहे. सध्या बँक ४०० दिवसांच्या कालावधीवर ८.०५% व्याज देत आहे.

टॅग्स :गुंतवणूकबँकिंग क्षेत्रपंजाब नॅशनल बँक