Join us

संपूर्ण कर्ज फेडणार ही कंपनी; 'या' ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये ५०० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:51 IST

PC Jewellers Stock Price: सलग ५ दिवसांच्या तेजीनंतर मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, त्यानंतर बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी आली.

PC Jewellers Stock Price: सलग ५ दिवसांच्या तेजीनंतर मंगळवारी पीसी ज्वेलरचे शेअर्स घसरले, त्यानंतर बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी आली. बुधवारी बीएसईमध्ये पीसी ज्वेलरचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वाढून १८.९० रुपयांवर पोहोचले. निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार, १० जुलै रोजी होत आहे. या बैठकीपूर्वीच कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली आहे. यापूर्वी, एनएसई आणि बीएसईनं मंगळवारी पीसी ज्वेलरचे शेअर्स शॉर्ट टर्म अॅडिशनल सर्व्हेलन्स मेजर्स (एएसएम) फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले आहेत. पीसी ज्वेलर्स चालू आर्थिक वर्षात संपूर्ण कर्ज फेडून कर्जमुक्त होण्याची तयारी करत आहे.

२ वर्षांत ५००% पेक्षा जास्त तेजी

गेल्या दोन वर्षांत ज्वेलरी कंपनी पीसी ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये ५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ७ जुलै २०२३ रोजी पीसी ज्वेलर्सचे शेअर्स २.९७ रुपये होते. ९ जुलै २०२५ रोजी ज्वेलरी कंपनीचे शेअर्स १८.९० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ९ जुलै २०२४ रोजी ज्वेलरी कंपनीचे शेअर्स ६.१८ रुपयांवर होते. ९ जुलै २०२५ रोजी स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स १८.९० रुपयांवर पोहोचले आहेत. पीसी ज्वेलरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १९.६५ रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ५.८८ रुपये आहे.

आधार कार्डातील बदलांसाठी नवे नियम; 'ही' चार कागदपत्रं आहेत आवश्यक, जाणून घ्या

वर्षभरात २०० टक्क्यांहून अधिक परतावा

या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, एका वर्षात सोन्याचा परतावा सुमारे ३० टक्के राहिला आहे. म्हणजेच या शेअरनं सोन्यापेक्षा जास्त परतावा दिला आहे.

तेजी का आहे?

पीसी ज्वेलर्सनं एप्रिल ते जून या तिमाहीत सुमारे ८० टक्के कमाई केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या तिमाहीत लग्न आणि सणासुदीमुळे ग्राहकांनी भरपूर खरेदी केली, ज्यामुळे कंपनीच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली. दुसरीकडे, कंपनीनं आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकांचं कर्ज निम्म्याहून अधिक कमी केलंय. आता आर्थिक वर्ष २०२६ च्या अखेरपर्यंत पूर्णपणे कर्जमुक्त होण्याचे कंपनीचं उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंपनीनं या तिमाहीत बँकांवरील कर्जात सुमारे ७.५ टक्क्यांनी कपात केली.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक