Join us  

Paytm गुंतवणूकदारांना मोठा झटका! दिवसभरात ३ टक्क्यांनी पडला शेअर; ९०० रुपयांपर्यंत खाली येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 4:10 PM

पेटीएमच्या शेअरने आतापर्यंतची सर्वांत नीचांकी पातळी नोंदवली असून, गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

मुंबई: कोरोना संसर्गाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे देशातील वाढते रुग्ण आणि तिसऱ्या लाटेची भीती यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक ६० हजारांखाली आला. यातच Paytm च्या गुंतवणूकदारांनाही जोरदार झटका बसल्याचे दिसत आहे. कारण पेटीएमचा शेअर १२०० रुपयांच्याही खाली आला आहे. 

सोमवारी बाजार उघडताच पेटीएमचा शेअर मोठ्या प्रमाणात कोसळला. पेटीएमचा शेअर उच्चांकी पातळीपासून आतापर्यंत ४० टक्क्यांनी कोसळल्याचे सांगितले जात आहे. Paytm च्या IPO बाबत गुंतवणूकदारांना खूप मोठी उत्सुकता होती. मात्र, शेअर मार्केटमध्ये एन्ट्री घेतल्यापासून पेटीएमच्या शेअरचा बार फुसका निघाल्याचे पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी पेटीएमच्या शेअरकडे पाठ फिरवल्यामुळे हा शेअर तेजीत आलेला नाही, असे सांगितले जात आहे. 

९०० रुपयांपर्यंत खाली येणार पेटीएमचा शेअर?

एका ब्रोकरेज फर्मने आगामी तिमाहीतील चढ-उतारांची स्थिती पाहता पेटीएमच्या शेअरसाठी ९०० रुपये टार्गेट प्राइज ठेवली आहे. यापूर्वी याच ब्रोकरेज फर्मने पेटीएमच्या शेअरसाठी १२०० रुपये टार्गेट प्राइज ठेवले होते. सोमवारी पेटीएमचा स्टॉक घसरणीसह १२२८ रुपयांवर खुला झाला. तर दुपारी तीन वाजेपर्यंत त्यात आणखी घट होऊन ३.७० टक्क्यांच्या घसरणीसह ११८५ अंकांवर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये हाहाःकार उडाल्याचे म्हटले जात आहे. पेटीएमचा शेअर आणखी किती खाली येणार, याची चिंता गुंतवणूकदारांना लागून राहिली आहे. पेटीएमचा शेअर लिस्टिंग झाला होता, तेव्हा त्याची प्राइज २१५० रुपये होती. 

टॅग्स :पे-टीएमइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार