Join us  

Paytm च्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी, 'या' कारणामुळे शेअरमध्ये झाली मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 1:42 PM

पाहा नक्की काय आहे प्रकरण, काय झालेत मोठे बदल.

पेटीएम आणि पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL or Paytm Payments Bank) यांच्यातील अनेक करार संपुष्टात येणार आहेत. पेटीएमच्या बोर्डानं त्याच्या सहयोगी संस्था, पीपीबीएलसह अनेक इंटर-कंपनी करार संपुष्टात आणण्यास मान्यता दिली आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सनं १ मार्च रोजी स्टॉक एक्सचेंजला याची माहिती दिली. याव्यतिरिक्त, पीपीबीएल भागधारकांनी पीपीबीएलच्या गव्हर्नन्सला समर्थन देण्यासाठी शेअरहोल्डर्स करार (SHA) सुलभ करण्यास सहमती दर्शविली असल्याचंही कंपनीनं म्हटलंय. 

स्टॉक एक्स्चेंज अपडेटमध्ये, One97 कम्युनिकेशन्सनं सांगितलं की बोर्डानं १ मार्च २०२४ रोजी करार संपुष्टात आणण्यास आणि SHA मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली. याशिवाय, पेटीएम आणि पीपीबीएलनं पेटीएम आणि त्यांच्या समूह संस्थांमधील अनेक इंटर-कंपनी करार संपुष्टात आणण्यास सहमती दर्शवली आहे. यापूर्वी, पेटीएमनं घोषणा केली होती की ती इतर बँकांसोबत नवीन भागीदारी करेल आणि ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना अखंड सेवा देण्यासाठी उपाययोजनाही करेल. 

कशी आहे शेअरची स्थिती? 

१ मार्च रोजी पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. सकाळी कंपनीचा शेअर बीएसईवर शेअर ४१३.५५ रुपयांच्या वाढीसह उघडला. अल्पावधीतच, मागील बंद किंमतीपेक्षा ३.६ टक्के वाढीसह तो ४२० रुपयांच्या स्तरावर पोहोचला. दुपारी कामकाजादरम्यान शेअर ४२१.७५ रुपयांवर ट्रेड करत होता. 

गेल्या एका महिन्यात स्टॉक ३३ टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचं मार्केट कॅप २६,५२६ कोटी रुपये आहे. अलीकडेच, पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या पार्ट टाईम नॉन-एक्झिक्युटिव्ह अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच बँकेच्या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजारभारतीय रिझर्व्ह बँकशेअर बाजार