Join us  

कर्ज फेडतो, पण व्याज देऊ शकत नाही, विजय माल्याचा बँकाकडे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 12:12 PM

सरकारी बँकांचे हजारो कोटी बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेल्या विजय माल्याने कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवली आहे.

नवी दिल्ली - सरकारी बँकांचे हजारो कोटी बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेल्या विजय माल्याने कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र कर्जाऊ रक्कम परत करण्यास तयार असलेल्या माल्याने कर्जावरील व्याज देऊ शकत नाही, असे बँकांना सांगितले आहे. विजय माल्या हा बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये थकवून परदेशात पसार झाला होता. त्यानंतर बँकांनी  त्याला दिवाळखोर घोषित केले होते. सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या माल्याने आज सकाळी एकापाठोपाठ एक तीन ट्विट करून थकित कर्जाची सशर्त परतफेड करण्याची तयारी दर्शवली. या ट्विटमधून कर्जाची परतफेड करण्याबाबत बँकाना प्रस्ताव देताना विजय माल्याने कर्जाची मूळ मुद्दत बँकाना देण्यास आपण तयार आहोत. मात्र व्याज देऊ शकत नाही, असे सांगितले. 

विजय माल्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, ''गेल्या तीन दशकांपासून किंगफिशर या मद्यसमुहाने भारतात व्यवसाय केला आहे. यादरम्यान या उद्योगसमुहाने विविध राज्यांनाही मदत केली. किंगफिशर एअरलाइन्ससुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणावर कर देत होती. मात्र या सुरेख कंपनीचा दु:खद शेवट झाला. मात्र तरीही मी बँकांना कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून, मी माझ्यावरील सर्व देणी देऊ इच्छितो.''   

यावेळी विजय माल्याने राजकारण्यांवरही जोरदार टीका केली. ''राजकारणी आणि प्रसारमाध्यमे मला सार्वजनिक बँकामधील पैसे बुडवणारा दिवाळखोर म्हणत आहेत. मात्र माझ्यावरील आरोप खोटे आहेत. माझ्यावर नेहमीच अन्याय झाला आहे. मी कर्जची रक्कम परत करण्याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयात एक प्रस्ताव दिला होता. मात्र त्याकडे सर्वांनी कानाडोळा केला.''   

टॅग्स :विजय मल्ल्याबँकिंग क्षेत्र