Join us  

... तर 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, बिस्कीट ब्रँड 'पारले जी' मंदीच्या संकटात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 12:01 PM

प्रसिद्ध बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि बँगो बाईट टॉफिजचा यांची एकत्रित उलाढाल जवळपास 10 हजार कोटी रुपयांची आहे.

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे लाखो नोकरदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. ऑटोमोबाईल श्रेत्रातील बेकारीनंतर आता खाद्य उत्पादनातही मंदीत सावट जाणवू लागले आहे. सुप्रसिद्ध आणि विश्वसनीय बिस्कीट ब्रँड असलेल्या आणि 10 हजार कोटींची उलाढाल असलेल्या पारले जी कंपनीतूनही कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. पारले जी कंपनीत सध्या 1 लाख कामगार काम करतात. 

भारतीय अर्थव्यवस्थेत घट झाल्यामुळे देशातील मोठ्या उद्योगधंद्यांवर त्याचा परिमाण झाला आहे. सन 2018-19 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. त्यानंतर, गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि अर्थतज्ञांची याबाबत चर्चा केली. मात्र, औद्यागिक क्षेत्रात या मंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि तेथील कर्मचाऱ्यांना होत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात लाखो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावल्यानंतर आता आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार आहे. प्रसिद्ध बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि मँगो बाईट टॉफिजचा यांची एकत्रित उलाढाल जवळपास 10 हजार कोटी रुपयांची आहे. या कंपनीत साधारपणे 1 लाख कर्मचारी काम करतात. पारलेकडून उत्पादनाशी संबंधित 10 कंपन्या चालवल्या जात आहेत. या कंपनींच्या उत्पादनाची 50 टक्के विक्री ही ग्रामीण भागांतील बाजारापेठांवर अवलंबून आहे. 

पारले प्रोडक्ट कंपनीचे प्रमुख मयांक शाह यांनी फायनान्स डेली या वृत्तसंस्थेशी बोलताना, जवळपास 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे म्हटले आहे. पारले बिस्कीटच्या किंमतीवरील जीएसटी कमी करावी, अशी मागणी केली आहे. ग्राहकांना कमी पैशात बिस्कीट पुरविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे केवळ 5 रुपये आणि त्याहीपेक्षा कमी किमतींच्या पॅकेटमध्ये आम्ही ग्राहकांना बिस्कीट उपलब्ध करुन देत आहोत. त्यामुळेच, केवळ 100 रुपये किलो किंवा त्यापैकी कमी किंमतीतीतील बिस्कीटकांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी कंपनीने केली आहे. तसेच, सरकारने आम्हाला प्रोत्साहन न दिल्यास, आमच्या सर्वच फर्ममधून नाईलाजास्तव 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांनी कपात केली जाईल, असे शाह यांनी म्हटले आहे. तसेच, शाह यांनी सरकारकडून लादण्यात येत असलेल्या जीएसटीबाबत नाराजी दर्शवली असून जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :अर्थव्यवस्थाकर्मचारीबेरोजगारी