Join us

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:37 IST

काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानच्या शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी पाकिस्तानचा शेअर बाजाराचा निर्देशांक केएसई-१०० निर्देशांक जोरदार घसरला.

काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताकडून कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानच्याशेअर बाजारात खळबळ उडाली आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी पाकिस्तानचाशेअर बाजाराचा निर्देशांक केएसई-१०० निर्देशांक ८८० अंकांनी घसरला. केएसई-१०० निर्देशांक दुपारच्या वेळी १,१७,५५० अंकांच्या खाली होता, जो आदल्या दिवसाच्या बंदच्या तुलनेत ८८० अंकांनी किंवा जवळपास १% घसरला होता. केएसई-१०० निर्देशांकची ५२ आठवड्यांची रेंज ७०,५६२.१२ अंक आणि १,२०,७९६.६७ अंकांचा आहे.

मोठे घटक कोणते आहेत?

पाकिस्तानच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये खळबळ माजण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे भारताकडून कारवाईची भीती. काश्मीरमधील पहलगाम शहराजवळील बैसारन या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश आहे. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दोन दिवसांचा सौदी अरेबिया दौरा रद्द करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यासोबतच मृतांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेतली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजामुळेही पाकिस्तानच्या शेअर बाजारातील विक्री झाली आहे. आयएमएफनं २०२५ या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानचा जीडीपी वाढीचा दर २.६ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जानेवारी २०२५ मध्ये हा अंदाज ३ टक्के होता. तर २०२६ साठी तो ३.६% राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, फिच रेटिंग्जनेही पाकिस्तानी रुपयात घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून अखेरपर्यंत पाकिस्तानी रुपया २८५ रुपये प्रति डॉलरपर्यंत घसरेल आणि पुढील आर्थिक वर्ष २०२६ च्या अखेरीस २९५ पर्यंत घसरेल, असा अंदाज रेटिंग कंपनीनं व्यक्त केलाय.

टॅग्स :पाकिस्तानशेअर बाजारपहलगाम दहशतवादी हल्ला