शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा असते, जेणेकरून भविष्यात त्यांना चांगली आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळू शकेल. पण एखाद्या टॉप कॉलेजमध्ये शिकूनही कुणाला नोकरी मिळाली नाही आणि फूड डिलिव्हरीचं काम करावं लागलं तर? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पदवीधर असलेल्या व्यक्तीबाबत हे घडलंय. डिंग युआनझाओ असं या व्यक्तीचे नाव असून तो सध्या फूड डिलिव्हरीचे काम करत आहे. चला जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.
नोकरीच मिळाली नाही
डिंग युआनझाओ हे ३९ वर्षांचे आहेत. गेल्या वर्षी त्यांची नोकरी गेली, त्यानंतर त्यांना नोकरी मिळाली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे डिंग युआनझाओ ऑक्सफर्ड विद्यापीठातून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून जैवविविधतेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी पेकिंग विद्यापीठातून एनर्जी इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी आणि सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून बायोलॉजीमध्ये पीएचडी केली आहे.
अनेक डिग्रींनंतरही नोकरी नाही
डिंग यांच्याकडे अनेक पदव्या आहेत, ज्या टॉप युनिव्हर्सिटीजच्या आहेत. असं असूनही डिंग यांना चांगली नोकरी मिळणं खूप अवघड गेलं. डिंग यांनी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस) येथे पोस्टडॉक्टोरल संशोधन केलं. परंतु त्यांचा करार मार्चमध्ये संपला. अशा तऱ्हेनं त्यांनी नंतर दुसरी नोकरी शोधायला सुरुवात केली. डिंग यांनी आपला सीव्ही अनेक ठिकाणी पाठवला. त्यांनी १० ठिकाणी मुलाखतीही दिल्या. पण कुठेही काम झालं नाही म्हणून डिंग सिंगापूरमध्ये फूड डिलिव्हरी वर्कर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
महिन्याला २ लाखांची कमाई
फूड डिलिव्हरीचं काम वाईट नाही, असं डिंग यांचं मत आहे. ते दिवसाचे १० तास काम करतात आणि दर आठवड्याला सुमारे ७०० सिंगापूर डॉलर (सुमारे ४७,००० रुपये) कमावतात. अशा तऱ्हेनं डिंग दर महिन्याला २ लाख रुपयांपर्यंत कमाई करतात. हे एक स्टेबल काम आहे, असं डिंग म्हणाले. या उत्पन्नातून मी माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतो. मेहनत केल्यास चांगली कमाई करता येते. याशिवाय फूड डिलिव्हरीचं काम केल्यानं व्यायामही होतो, असं डिंग यांचं म्हणणं आहे.