Join us  

Zomato वरुन ऑर्डर करणं पडणार महागात, कंपनीनं 'या' शुल्कात केली २५ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 10:33 AM

Zomato Food Delivery : आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवरून ऑर्डर करणं थोडं महागात पडणार आहे. कंपनीनं एका शुल्कात २५ टक्क्यांची वाढ केलीये.

Zomato Food Delivery : हल्ली अनेकदा आपण जेवण बाहेरुन ऑर्डर करत असतो. यासाठी आपण ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप्सची मदत घेतो. पण आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवरून (Zomato) ऑर्डर करणं थोडं महागात पडणार आहे. कंपनीनं आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये २५ टक्क्यांची वाढ केलीये. कंपनीनं मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी ही घोषणा केली. यासोबतच Zomato नं त्यांची इंटरसिटी लीजेंड्स फूड डिलिव्हरी सेवा बंद करण्याचाही निर्णय घेतलाय. 

ऑगस्ट २०२३ मध्ये झोमॅटोनं (Zomato) आपलं मार्जिन वाढवण्यासाठी आणि कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी २ रुपये प्लॅटफॉर्म फी सुरू केली. नंतर ती ३ रुपये आणि नंतर १ जानेवारीला ती ४ रुपये करण्यात आली. यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी कंपनीने प्लॅटफॉर्म फी तात्पुरती ९ रुपये केली होती. 

एका वर्षात ८५-९० कोटी ऑर्डर्स 

प्लॅटफॉर्म फी वाढीमुळे डिलिव्हरी शुल्कावरील जीएसटीचा परिणाम अंशतः कमी होईल. कंपनी दरवर्षी सुमारे ८५-९० कोटी ऑर्डर पूर्ण करते. प्रत्येक १ रुपया वाढीतील वृद्धीमुळे EBITDA वर ८५-९० कोटी रुपयांचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तो जवळपास ५ टक्के असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. दरम्यान, ही वाढ सध्या काही शहरांमध्येच प्रभावी आहे. 

महसूल झाला दुप्पट 

झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी व्यवसायानं डिसेंबर तिमाहीत अॅडजस्ट रेव्हेन्यूमध्ये वार्षिक ३० टक्के वाढ नोंदवली असून ती २,०२५ कोटी रुपये झाली आहे. या कालावधीत ब्लिंकिटचा महसूल दुप्पट होऊन ६४४ कोटी रुपये झालाय. झोमॅटोच्या मुख्य व्यवसायातील वाढता नफा आणि त्याच्या ब्लिंकिटच्या वेगवान वाढीमुळे झोमॅटोच्या शेअरची किंमत वाढत आहे.

टॅग्स :झोमॅटोअन्न