Join us

Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 08:27 IST

Ola Electric CCPA Notice : ग्राहक व्यवहार मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) ओलाच्या तक्रारींबाबतच्या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Ola Electric Bhavish Agarwal : भाविश अग्रवाल यांची कंपनी ओला इलेक्ट्रिकला इलेक्ट्रिकच्या (Ola Electric) दुचाकींमधील कथित समस्या आणि सर्व्हिस स्टँडर्डमधील त्रुटींशी संबंधित तक्रारींच्या प्रकरणी अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. ग्राहक व्यवहार मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सीसीपीएच्या मुख्य आयुक्त आणि ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी गुरुवारी यासंदर्भातील माहिती दिली. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (बीआयएस) प्रमुखांना याची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर योग्य ती पावले उचलली जातील, असं त्यांनी नमूद केलं. ६ नोव्हेंबर रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलंय.

मंत्रालयाच्या नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइनकडे गेल्या वर्षी सप्टेंबर ते या वर्षी ऑगस्ट दरम्यान ओलाच्या ई-स्कूटरमधील कथित त्रुटी आणि निकृष्ट सेवेबद्दल १०,००० हून अधिक तक्रारी मिळाल्या होत्या. त्यापैकी ३३०० हून अधिक तक्रारी सेवेतील दिरंगाईशी संबंधित होत्या, तर सुमारे १९०० तक्रारी नवीन वाहनं पोहोचवण्यास उशीर झाल्याच्या होत्या. कंपनीनं दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याची तक्रार सुमारे दीड हजार ग्राहकांनी केली.

यापूर्वी बजावलेली नोटीस

या तक्रारींची दखल घेत सीसीपीएनं ७ ऑक्टोबर रोजी ओला इलेक्ट्रिकला नोटीस बजावली. या नोटिसीत ग्राहक हक्कांच्या उल्लंघनासह अनेक मुद्द्यांवर जाब विचारण्यात आला आहे. ओला इलेक्ट्रिकने २१ ऑक्टोबर रोजी या नोटिसीला उत्तर दिलं होतं. यामध्ये ग्राहकांच्या ९९ टक्के तक्रारींचं निराकरण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. "बहुतेक तक्रारींमध्ये पार्ट्स लॉस किंवा सॉफ्टवेअरबद्दल ग्राहकांची माहिती नसणं यासारख्या किरकोळ समस्या होत्या," असं गेल्या आठवड्यात ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितलं होतं. 

मात्र, सीसीपीएनं तक्रार करणाऱ्या काही ग्राहकांशी संपर्क साधला असता, बहुतांश ग्राहकांनी तक्रारी दूर होत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर सीसीपीएने बीआयएस प्रमुखांना सविस्तर चौकशी करण्यास सांगितलं.

ओलाच्या शेअर्सची स्थितीओला इलेक्ट्रिकचा शेअर ९ ऑगस्ट रोजी ७६ रुपयांवर लिस्ट झाला होता. २० ऑगस्ट रोजी कंपनीच्या शेअरनं १५७ रुपयांचा उच्चांक गाठला होता. १४ नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर ६९.६२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

टॅग्स :ओलाइलेक्ट्रिक कार / स्कूटर