Join us

Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:43 IST

Reliance JIO-BP Petrol Pump : पेट्रोल पंप उघडण्याचा विचार करत असाल तर मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ-बीपी तुम्हाला संधी देत आहे. यासाठी रिलायन्स जिओ-बीपीनं एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

Reliance JIO-BP Petrol Pump : पेट्रोल पंप उघडण्याचा विचार करत असाल तर मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ-बीपी तुम्हाला संधी देत आहे. यासाठी रिलायन्स जिओ-बीपीनं एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पेट्रोल पंप कोण उघडू शकतो आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज भासणार आहे, हे जाणून घेऊ.

जर एखाद्या व्यक्तीकडे महामार्ग किंवा शहरात जमीन असेल तर ते पेट्रोल पंप उघडू शकतात. मात्र, त्यासाठी महामार्गालगत किमान ३ हजार चौरस मीटर आणि शहरात १२०० चौरस मीटर जागा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या नजीकच्या जमिनीचा आकार कमीत कमी २००० चौरस मीटर असावा.

मोठी गुंतवणूक करावी लागणार

नुसती जमीन असेल तर चालेल असं वाटत असेल तर तसं होणार नाही. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठीही मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. जमिनीसह दोन कोटींहून अधिक गुंतवणूक करावी लागेल, असं जाहिरातीत म्हटलं आहे. तथापि, गुंतवणुकीची ही रक्कम स्थानानुसार कमी-अधिक असू शकते.

अर्ज कसा कराल?

रिलायन्स जिओ-बीपीचं पेट्रोल पंप डीलर व्हायचं असेल तर त्यासाठी जाहिरातीत वेबसाइटचं नाव देण्यात आलं आहे. यासाठी तुम्ही partners.jiobp.in जाऊन अर्ज करू शकता. वेबसाइटवर एक फॉर्म मिळेल. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, शहर आदींची माहिती द्यावी लागते. याशिवाय अर्जदार jiobp.dealership@jiobp.com यावर ईमेल देखील करू शकतात. याशिवाय 'हाय' लिहून 7021722222 व्हॉट्सअॅप नंबरवरही संपर्क साधू शकता.

फसवणुकीला बळी पडू नका

वेबसाइटवर कंपनीनं फसवणूक टाळण्यासाठी टिप्सही दिल्या आहेत. चॅनेल पार्टनर अपॉइंटमेंटची सुविधा देण्यासाठी त्यांच्याकडे एजंट नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. अशा वेळी कोणत्याही थर्ड पार्टीशी व्यवहार करू नका. असं केल्यानं फसवणूक होऊ शकते. कोणी पैसे मागितले तर अजिबात देऊ नका. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असंही त्यांनी नमूद केलंय.

टॅग्स :पेट्रोल पंपजिओ