नवी दिल्ली : सामान्य विमा व आरोग्य विमा क्षेत्रातील कंपन्या तसेच सरकारी विमा कंपन्या १०० रुपयांचा प्रीमियम घेऊन केवळ ८६ रुपयांचा क्लेम देतात, अशी माहिती ‘भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणा’ने (इरडा) जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. काही विमा कंपन्या तर १०० रुपयांमागे केवळ ५६ रुपयांचाच क्लेम देत आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
विमा खरेदी करताना कंपन्या प्रिमियमच्या तुलनेत दाव्याची किती रक्कम देतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. अहवालानुसार, वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये सामान्य विमा कंपन्यांनी दाव्यांपोटी ७६,१६० कोटींचे पेमेंट केले. २०२२-२३च्या तुलनेत हा आकडा १८ टक्के अधिक आहे. २०२३-२४ मध्ये कंपन्यांनी ८३ टक्के दाव्यांचा निपटारा केला. १०० रुपयांच्या प्रीमियममागे ८० रुपयांचा क्लेमचे प्रमाण समाधानकारक आहे.
२.६९ कोटी दाव्यांचा आरोग्य विमा कंपन्यांनी निपटारा करून ८३,४९३ कोटी रुपयांचे पेमेंट केले. ३१,०८६ रुपये एवढी दाव्यांची सरासरी रक्कम होती.
थर्ड पार्टीकडून ७२% निपटारा
एकूण दाव्यांपैकी ७२ टक्के दाव्यांचा निपटारा थर्ड पार्टीने केला. २८ टक्के दाव्यांचा निपटारा कंपन्यांनी आपल्या पद्धतीने केला.
६६.१६ टक्के दावे कॅशलेस पद्धतीने झाले ३९ टक्के दावे प्रतिपूर्तीद्वारे (रिएंबर्समेंट) दिले गेले.
सरकारी कंपन्या आघाडीवर
दाव्यांचा निपटारा करण्यात सरकारी कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांनी १०० रुपये प्रिमियमच्या माेबदल्यात १०३ रुपये दिले आहेत.