Join us  

लवकरच कांद्याचे दर घसरणार, प्रति किलो ४० रुपयांपर्यंत होतील; अधिकाऱ्यांनी दिली माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 4:21 PM

राष्ट्रीय राजधानीत कांद्याची किरकोळ किंमत ८० रुपये प्रति किलो आणि मंडईंमध्ये ६० रुपये किलोच्या जवळपास पोहोचल्यानंतर सरकारने पुढील वर्षी मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

नवी दिल्ली : जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव सध्याच्या सरासरी ५७.०२ रुपये प्रति किलोवरून ४० रुपये प्रति किलोपर्यंत खाली येतील अशी सरकारची अपेक्षा आहे, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय राजधानीत कांद्याची किरकोळ किंमत ८० रुपये प्रति किलो आणि मंडईंमध्ये ६० रुपये किलोच्या जवळपास पोहोचल्यानंतर सरकारने पुढील वर्षी मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

कांद्याचे भाव ४० रुपये प्रति किलोच्या खाली कधी येतील, असे पत्रकारांनी विचारले असता रोहित कुमार सिंह म्हणाले, 'लवकरच...जानेवारी.'  दरम्यान, 'डेलॉइट ग्रोथ विथ इम्पॅक्ट गव्हर्नमेंट समिट'च्या निमित्ताने रोहित कुमार सिंह म्हणाले की, कांद्याचे दर १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतील असे काही जण म्हणत होते. पण, आम्ही ६० रुपये प्रतिकिलो कधीच ओलांडणार नाही, असे सांगितले. आज सकाळी देशात सरासरी ५७.०२ रुपये प्रति किलो होता आणि हा ६० रुपये प्रति किलोच्या पुढे जाणार नाही.

याचबरोबर, निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि हा व्यापार्‍यांचा एक छोटा गट आहे, जो भारतीय आणि बांगलादेशातील बाजारातील किमतीतील तफावतीचा फायदा घेत आहे. जे (वेगवेगळ्या किमतींचा फायदा घेणारे व्यापारी) नुकसान सोसतील, पण त्याचा फायदा कोणाला होणार... (ते) भारतीय ग्राहक आहेत, असे रोहित कुमार सिंह म्हणाले. दरम्यान, ग्राहक किंमत निर्देशांकात (CPI) कांद्याची महागाई जुलैपासून दुहेरी आकड्यात वाढत आहे. जी ऑक्टोबरमध्ये ४२.१ टक्क्यांच्या चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे.

सरकारद्वारे उचललेली पावलेया आर्थिक वर्षात १ एप्रिल ते ४ ऑगस्ट दरम्यान देशातून ९.७५ लाख टन कांद्याची निर्यात झाली. मूल्याच्या बाबतीत बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख आयातदार देश आहेत. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यावर्षी २८ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कांद्याच्या निर्यातीवर ८०० डॉलर प्रति टनाची किमान निर्यात किंमत (MEP) लागू करण्यात आली आहे. तसेच, ऑगस्टमध्ये भारताने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले होते. ऑक्टोबरमध्ये भाज्यांच्या घाऊक महागाई दरात २१.०४ टक्क्यांनी घट झाली. मात्र, या महिन्यात कांद्याचा वार्षिक दर ६२.६० टक्क्यांच्या उच्च पातळीवर राहिला. 

टॅग्स :कांदाव्यवसाय