Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एकतृतीयांश जगाला यंदा बसणार मंदीचा फटका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 11:24 IST

एका मुलाखतीत जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, अमेरिका, युरोपीय संघ आणि चीन यांना यंदा मंदीचा सामना करावा लागेल.

वॉशिंग्टन : जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये यंदा विकासाची गती संथ झाली आहे. परिणामी जगाच्या एकतृतीयांश अर्थव्यवस्थेला यंदा मंदीचा फटका बसू शकताे, असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा यांनी दिला आहे. 

एका मुलाखतीत जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, अमेरिका, युरोपीय संघ आणि चीन यांना यंदा मंदीचा सामना करावा लागेल. त्यांच्यासाठी २०२३ हे वर्ष गेल्या वर्षीपेक्षा अधिक कठोर असेल. ज्या देशांत मंदी नाही, त्या देशांतील लक्षावधी लोकांनाही मंदीसदृश स्थितीचा सामना करावा लागेल. कोविड साथ आणि जागतिक मंदीचा काळ वगळल्यास यंदा आर्थिक विकास सर्वांत कमकुवत दिसत आहे.

चीनमधील वाढत्या कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर जॉर्जिएव्हा यांनी सांगितले की, आगामी काही महिने चीनसाठी कठीण असतील. चीनच्या आर्थिक वृद्धीवर प्रतिकूल परिणाम दिसून येईल. त्याचा जागतिक वृद्धीवरही प्रतिकूल परिणाम दिसून येईल. नाणेनिधीने यापूर्वीच्या अंदाजात म्हटले होते की, जागतिक वृद्धिदर २०२३ मध्ये घटून २.७ टक्क्यांवर येईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :व्यवसाय