Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे धारावी प्रकल्पावरुन शिवसेनेचा विरोध अन् अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 10:31 IST

गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली

राष्ट्रीवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांसोबत सौहार्दाचे संबंध आहेत. तर, उद्योग क्षेत्रातही त्यांचे बड्या उद्योगपतींसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सध्या अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असते. त्यामुळे, त्यांच्याशी एखाद्या राजकीय नेत्याची भेट झाल्यास अनेकांच्या भुवया उंचावतात. नुकतेच, शरद पवार यांनी गौतम अदानांचा नामोल्लेख करत त्यांचे आभार मानले होते. त्यानंतर, आता गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 

गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेकजण गौतम अदानी यांच्यावर थेट नाव घेऊन टीका करतात. तर, मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदांनींना देण्यात आल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जोरदार विरोध केला आहे. महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांकडून सातत्याने अदानींना लक्ष्य केलं जातं. मात्र, शरद पवार यांच्याकडून अदानींवर कुठलीही टीका केली जात नसून याउलट दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा प्रत्यय सातत्याने येतो. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या बारामतीमधील शिक्षणसंस्थेला अदानी ग्रुपकडून २५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. त्यामुळे, शरद पवार यांनी जाहीरपणे अदानींचे अभार मानले आहेत. त्यानंतरही शरद पवार आणि अदानी यांच्यातील व्यक्तिगत मैत्रीसंदर्भाने चर्चा होऊ लागल्या. आता, गुरुवारी रात्री अचानकपणे अदानींनी शरद पवारांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच चर्चा होत आहे. 

टॅग्स :शरद पवारगौतम अदानीसुप्रिया सुळे