Join us

"हे जरा अव्यवहार्य, माणूस ८-९ तासांपेक्षा जास्त वेळ..."; कामाच्या वेळेवर अदर पूनावालांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:01 IST

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी कामकाजाच्या तासांबद्दल सुरू असलेल्या वादावर आपले मत व्यक्त केले.

Adar Poonawalla: लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याच्या दिलेल्या सूचनेवरून चर्चा अद्यापही सुरुच आहेत. आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी कामकाजाच्या तासांबद्दल सुरू असलेल्या वादावर आपले मत व्यक्त केले.  कठोर परिश्रमाला पर्याय नाही, पण कोणीही दररोज ८-९ तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाही, असं अदर पूनावाला यांनी म्हटलं.

एल अँड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यन यांनी केलेल्या विधानांमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर तीव्र टीका होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर व्यावसायिक क्षेत्रातूनही बरीच टीका झाली. काम स्मार्ट पद्धतीने केले पाहिजे गुलामगिरीसारखे नाही, असं म्हणत अनेकांनी सुब्रमण्यन यांच्यावर निशाणा साधला. एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांकडून ९० तासांची अपेक्षा केल्यानंतर अदर पूनावाला यांनीही ८-९ तास सतत काम केल्यानंतर माणूस उत्पादक होऊ शकत नाही असं मत मांडले आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अदर पूनावाला यांनी एल अँड टी अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावर मत व्यक्त केले.  "या लोकांना वाटते की कठोर परिश्रम खूप महत्वाचे आहेत.त्याबाबत कोणताही वाद नाहीत आणि कठोर परिश्रमाला पर्याय नाही. परंतु नक्कीच, तुम्हाला सामाजिक जीवन जगणे आणि तुमचे जीवन संतुलित करणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही ताजेतवाने होऊ शकता आणि पुन्हा चांगले काम करु शकता, असं अदर पूनावाला म्हणाले. नातेसंबंध निर्माण करणे आणि लोकांना भेटणे, मग तो निधी उभारणे असो किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणे हे कार्यालयीन वेळेइतकेच महत्त्वाचे आहे यावरही पूनावाला यांनी जोर दिला.

"मनुष्य ८-९ तासांपेक्षा जास्त काळ उत्पादक राहू शकत नाही. कधीकधी, तुम्हाला इतके तास काम करावे लागते, आणि ते ठीक आहे. परंतु तुम्ही ते दररोज करू शकत नाही. तुम्ही सोमवार ते रविवार ऑफिसमध्ये काम करू शकत नाही. हे जरा अव्यवहार्य आहे. जर तुम्ही उद्योजक असाल आणि व्यवसाय उभारत असाल तर तुम्ही कठोर परिश्रम केले पाहिजे आणि जे काही लागेल ते केले पाहिजे. मी असे म्हणत नाही की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. कधीकधी, तुम्हाला ते तास द्यावेच लागतात, ते ठीक आहे. परंतु आपण हे दररोज करू शकत नाही," असं स्पष्ट मत अदर पूनावाला यांनी मांडले.

काय म्हणाले होते एसएन सुब्रमण्यन?

एका संवादादरम्यान, तुम्ही घरी बसून काय करता? किती वेळ बायकोकडे टक लावून बघू शकता? बायका नवऱ्याकडे किती वेळ टक लावून बघू शकतात? तुम्ही ऑफिसला जा आणि तुमचं काम करायला लागा. खरे सांगायचे तर, रविवारी मी तुम्हाला काम करायला लावू शकत नाही याचे मला वाईट वाटते. जर मी तुम्हाला रविवारी देखील कामावर आणू शकलो तर मला खूप आनंद होईल, कारण मी स्वतः देखील रविवारी काम करतो", असं एसएन सुब्रमण्यन म्हणाले होते.

टॅग्स :अदर पूनावालाव्यवसाय