Join us  

OLA देणार 10 हजारहून अधिक महिलांना नोकरी, ई-स्‍कूटर प्‍लांट फक्त महिलाच चालविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 5:01 PM

Ola E-scooter : हा जगातील एकमेव मोटार वाहन निर्मिती प्रकल्प असेल जो केवळ महिलांद्वारे चालवला जाईल, असे भाविश अग्रवाल म्हणाले.

नवी दिल्ली : ओलाने देशातील ऑटो मार्केटमध्ये ई-स्कूटर आणल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये फक्त महिला ओला इलेक्ट्रिक स्कूटर प्लांट (Ola E-scooter) चालवतील. यासाठी 10 हजारांहून अधिक महिलांना प्लांटमध्ये रोजगार मिळणार आहे. आत्मनिर्भर भारताला (Aatmanirbhar Bharat) आत्मनिर्भर महिलांची (Aatmanirbhar women) गरज आहे. तसेच, हा जगातील एकमेव मोटार वाहन निर्मिती प्रकल्प असेल जो केवळ महिलांद्वारे चालवला जाईल, असे भाविश अग्रवाल म्हणाले.

याचबरोबर, भाविश अग्रवाल यांनी ओला ई-स्कूटर प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या पहिल्या तुकडीचे सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून स्वागत केले. ते म्हणाले की, ही ओला फ्यूचर फॅक्टरी (Ola FutureFactory) केवळ 10,000 हून अधिक महिला कर्मचाऱ्यांसह महिलांनी चालवलेली जगातील सर्वात मोठी फॅक्टरी बनेल. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अधिक समावेशक कार्यबल तयार करण्याचा ओलाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या महिलांचे मुख्य उत्पादन कौशल्य सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ओला फ्यूचर फॅक्टरीमध्ये उत्पादित प्रत्येक वाहनासाठी त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल.

एका रिपोर्टचा हवाला देत ओलाचे चेअरमन अग्रवाल म्हणाले की, केवळ महिलांनाच श्रमशक्तीमध्ये समान संधी मिळाल्याने देशाचे सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) 27 टक्क्यांनी वाढू शकते. उत्पादन क्षेत्रात महिलांचा सहभाग सर्वात कमी 12 टक्के आहे. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना सक्षम करणे केवळ त्यांचे जीवनच नव्हे तर त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण समाज देखील सुधारते. भारताला जगातील उत्पादन केंद्र बनवण्यासाठी आपण महिलांना कार्यशक्तीमध्ये समाविष्ट करून त्यांचे कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असे अग्रवाल म्हणाले.

दरवर्षी प्लांटमध्ये एक कोटी ई-स्कूटरची निर्मितीई-स्कूटर निर्मितीसाठी ओलाने गेल्या वर्षी तामिळनाडूतील आपल्या पहिल्या ई-स्कूटर प्लांटवर 2,400 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. सुरुवातीला ते 10 लाख प्रतिवर्षाच्या क्षमतेसह निर्मिती सुरू करण्यात येईल. बाजाराच्या मागणीनुसार ते 20 लाखांपर्यंत वाढवता येते, असे ओलाकडून सांगण्यात आले होते. तसेच, ओलाने दावा केला होता की एकदा पूर्णपणे तयार झाल्यावर, त्याच्या प्लांटमध्ये वार्षिक 1 कोटी ई-स्कूटरची निर्मिती होईल. गेल्या आठवड्यात, कंपनीने ओला ई-स्कूटर एस -1 ची विक्री एका आठवड्याद्वारे 15 सप्टेंबर 2021 पर्यंत हलवली. कंपनीने गेल्या महिन्यात ई-स्कूटर ओला एस -1 आणि एस -1 प्रोचे दोन प्रकार बाजारात आणले. त्यांची किंमत 99,999 आणि 1,29,999 रुपये आहे.

टॅग्स :ओलावाहनव्यवसाय