Join us  

चीनमधील लक्षाधीशांची संख्या ५ वर्षांत होणार दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:26 AM

China News: चीनमधील लक्षाधीशांची (मिलेनिअर्स) संख्या आगामी ५ वर्षांत वाढून दुप्पट होईल, असे ‘एचएसबीसी होल्डिंग्ज पीएलसी’च्या एका अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : चीनमधील लक्षाधीशांची (मिलेनिअर्स) संख्या आगामी ५ वर्षांत वाढून दुप्पट होईल, असे ‘एचएसबीसी होल्डिंग्ज पीएलसी’च्या एका अहवालात म्हटले आहे.एचएसबीसीच्या अहवालात म्हटले आहे की, चीनमधील १० दशलक्ष युआनपेक्षा (१.५५ दशलक्ष डॉलर) जास्त गुंतवणूक योग्य संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या २०२५ पर्यंत वाढून ५ दशलक्ष होईल. सध्या ती २ दशलक्ष आहे. सध्या ३४० दशलक्ष संख्या असलेला मध्यमवर्ग ४५ टक्क्यांनी वाढून ५०० दशलक्षांवर जाईल. एचएसबीसीचे अर्थतज्ज्ञ क्यू हाँगबिन यांनी सांगितले की, विस्तारित होणाऱ्या मध्यमवर्गामुळे अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन वृद्धीला बळ मिळेल. वस्तू उपभाेग मजबूत होऊन देशांतर्गत मागणी वाढेल. अंतिमत: व्यवसायिक आत्मविश्वास आणि भांडवली खर्चात वाढ होईल.एचएसबीसीने म्हटले की, आगामी पाच वर्षात चीनची पारिवारिक संपत्ती ८.५ टक्क्यांनी वाढेल. गुंतवणूकयोग्य संपत्ती २०२५ पर्यंत ३०० लाख कोटी युआन होईल. हा आकडा २०२० मधील चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३०० टक्के आहे. अहवालात म्हटले आहे की, मध्यमवर्गात वाढ होणे याचा अर्थ दर्जेदार वस्तू व सेवांची मागणी वाढणे होय. वाढलेल्या प्रत्येक मध्यमवर्गीयाकडून दररोज २० डॉलरच्या खर्चाची भर अर्थव्यवस्थेत पडेल. त्यातून चीनचा वस्तू उपभाेग वर्षाला तब्बल १.१ लाख कोटी डॉलरने वाढेल. २०२० मध्ये जगातील केवळ सात देशांतील मध्यमवर्गीयांचा खर्च १.१ लाख कोटी डॉलरच्या वर असून त्यात चीनचा समावेश आहे.एचएसबीसीने म्हटले की, आर्थिक वृद्धीबरोबरच चीनमधील सांपत्तिक विषमताही वाढत आहे. चीनच्या एकूण संपत्तीपैकी ३० टक्के संपत्ती वरच्या श्रेणीतील १ टक्का लोकांच्या ताब्यात आहे. 

टॅग्स :चीनअर्थव्यवस्थाभारत