NSE Pahalgam 1 Crore Help: भारतीय शेअर बाजारातील प्रमुख एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान यांनी गुरुवारी पहलगाम हल्ल्याबद्दल तीव्र दु:ख केलं. "या कठीण काळात मृतांच्या कुटुंबियांसोबत एकजूट म्हणून एनएसईनं त्यांना एक कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे,” असं ते म्हणाले.
"२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला खूप दु:ख झालं आहे. यात २६ जणांचा मृत्यू झाला होता," असं एनएसईचे प्रमुख आशिष कुमार चौहान यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. मंगळवारी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा थेट संबंध पाकिस्तानशी असल्याचंही म्हटलं जातंय.
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
अंबानींचा मदतीचा हात
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनीही काल पीडितांना मदतीचा हात पुढे केला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, असं ते म्हणाले. सर्व जखमींवर मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन सर एचएन रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी माहिती अंबानी यांनी दिली.
मोदींचाही कठोर संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय. पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी आणि हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा होईल, असा इशारा पंतप्रधानांनी दिलाय. पहलगाम हल्ल्यानंतर देशात एकापाठोपाठ एक महत्त्वाच्या बैठका होत आहेत. तसंच भारत मोठी कारवाई करू शकतो अशी भीतीही पाकिस्तानला वाटत आहे.