NSDL IPO: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) आगामी ४,००० कोटी रुपयांचा आयपीओ मोठ्या नफ्याची संधी घेऊन आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या रकमेवर कोट्यवधींचा भरघोस परतावा मिळणारे. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एनएसडीएलचे काही शेअर्स केवळ २ रुपयांना विकत घेतले होते, जे आता ८०० रुपयांना विकले जातील. म्हणजे एसबीआयची छोटी गुंतवणूक आता कोट्यवधींमध्ये बदलणार आहे. त्यांना जवळपास ३९,९०० टक्के परतावा मिळेल.
या आयपीओमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया एनएसडीएलचे ४० लाख शेअर्स विकत आहे, जे त्यांनी फक्त ₹२ प्रति शेअर या दरानं खरेदी केले होते. ₹८०० च्या हायर बँडवर, एसबीआय ₹३२० कोटींची कमाई होण्याची शक्यता आहे. त्यांची एकूण गुंतवणूक ८० लाख रुपये होती.
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
IDBI लाही मोठा नफा
आयडीबीआय बँकेनं एनएसडीएलचं २.२२ कोटी शेअर्स फक्त ₹ २ प्रति शेअर दरानं खरेदी केले होते. आता हे शेअर्स विकून त्यांना सुमारे ₹१,७७६ कोटी मिळतील, तर आयडीबीआयने सुरुवातीला फक्त ₹४.४४ कोटींची गुंतवणूक केली होती. याचा अर्थ बँकेचे पैसे ३९,९००% नं वाढले.
युनियन बँक ऑफ इंडियाचे ५ लाख शेअर्स आहेत, जे त्यांनी ₹५.२० प्रति शेअर या दराने खरेदी केले. आता ते शेअर्स विकून बँकेला ₹४० कोटी मिळतील, जे तिच्या ₹२६ लाख गुंतवणुकीपेक्षा खूप जास्त आहे, म्हणजेच सुमारे १५,०००% परतावा. तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने NSDL मधील २४% हिस्सा सरासरी ₹ १२.२८ प्रति शेअर या किमतीने खरेदी केला. आता NSE १.८ कोटी शेअर्स विकून ₹१,४१८ कोटींचा नफा कमवणार आहे, म्हणजेच ६,४१५% परतावा देत आहे.
किती गुंतवणूक करावी लागणार?
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) IPO चा प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं आयपीओसाठी प्राईज बँड ७६० ते ८०० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. कंपनीनं १८ शेअर्सचा एक मोठा लॉट तयार केला आहे. ज्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,४०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कोणताही किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटमध्ये पैसे गुंतवू शकतो. कंपनीनं कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ७६ रुपयांची सूट दिली आहे. एनएसडीएलचा आयपीओ ३० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान खुला असेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)