Join us

स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट; आता RBI कडून 'ही' खास सेवा लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 15:07 IST

UPI Payment : फीचर फोन वापरणाऱ्या युजर्सना मोठी भेट देताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंगळवारी यूपीआय (UPI) आधारित पेमेंट्स प्रोडक्ट लाँच केले आहे. याच्या मदतीने फीचर फोन युजर्स सहज डिजिटल पेमेंट करू शकतील.

नवी दिल्ली : देशातील करोडो फीचर फोन युजर्ससाठी (Feature Phone Users) एक आनंदाची बातमी आहे. आता डिजिटल पेमेंट (Digital Payment) करण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटची  (Internet) गरज भासणार नाही. फीचर फोन वापरणाऱ्या युजर्सना मोठी भेट देताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंगळवारी यूपीआय (UPI) आधारित पेमेंट्स प्रोडक्ट लाँच केले आहे. याच्या मदतीने फीचर फोन युजर्स सहज डिजिटल पेमेंट करू शकतील.

देशात करोडो लोक फीचर फोन वापरतात. त्यापैकी बहुतांश ग्रामीण भागात राहणारे लोक आहेत. हे लोक महागडे स्मार्टफोन खरेदी करू शकत नाहीत आणि कॉलिंग व मेसेजिंग सुविधा असलेले फीचर फोन वापरतात. असे लोक आता UPI पेमेंट देखील करू शकतील.  भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा युझर्ससाठी खास युपीआय सेवा (UPI Service) लॉन्च केली आहे. UPI 123PAY असे या नव्या सेवेचे नाव आहे. यामुळे ग्रामीण भागातही डिजिटल पेमेंट नेटवर्क वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. 

या नव्या सेवेद्वारे असे युजर्सनाही पेमेंट करता येणार आहे, ज्यांच्याकडे जुन्या पद्धतीचा फीचर फोन आहे स्मार्ट फोन नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही नवी सेवा मंगळवारी लॉन्च केली. गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, समाजातील वंचित घटकांना विशेषतः ग्रामीण भागातील लोकही युपीआय सेवांचा वापर करु शकणार आहेत. दरम्यान, युपीआय पेमेंट करताना काही अडचण येऊ नये यासाठी चोवीस तास हेल्पलाईन सेवा देखील सुरु करण्यात आली आहे.

24*7 हेल्पलाइन देखील उपलब्ध असेलभारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी एका ट्विटमध्ये सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर 8 मार्च 2022 रोजी दुपारी 12 वाजता फीचर फोनसाठी यूपीआय सुविधा UPI123Pay आणि डिजिटल पेमेंटसाठी 24*7 हेल्पलाइन- Digisathi लाँच करत आहेत. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फीचर फोनसाठी डिजिटल पेमेंट सिस्टम सुरू करण्याची घोषणा केली होती. यूपीआय ही देशातील लोकप्रिय पेमेंट सिस्टिम म्हणून उदयास आली आहे.

देशात फीचर फोन युजर्स किती आहेत?TRAI च्या ऑक्टोबर 2021 च्या आकडेवारीनुसार, 118 कोटी मोबाईल फोन युजर्स आहेत. यामधील काही अजूनही फीचर फोन वापरतात. देशात 74 कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत. उर्वरित 44 कोटी फीचर फोन युजर्स डिजिटल पेमेंटचा पर्याय वापरू शकत नाहीत. या UPI123Pay सेवेद्वारे फीचर फोन युजर्स स्मार्टफोन युजर्सप्रमाणेच डिजिटल पेमेंट करू शकतील. या सेवेमुळे युजर्स अगदी कमी रक्कम सहज पेमेंट करू शकतील.

टॅग्स :व्यवसायभारतीय रिझर्व्ह बँक